काठमांडू : पुन्हा एकदा पुष्प कमल दहल प्रचंड हेच नेपाळची सत्ता सांभाळणार आहेत. ते नेपाळचे पुढील पंतप्रधान असतील आणि सोमवारी (२६ डिसेंबर) स्थानिक वेळेनुसार दुपारी ४ वाजता ते तिसऱ्यांदा नेपाळचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतील. नेपाळच्या राष्ट्रपती कार्यालयाने ट्विट करून ही माहिती दिली.
नेपाळमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर कोणत्याही राजकीय पक्षाला बहुमत मिळाले नाही. परंतु नाट्यमय घडामोडींमध्ये, विरोधी सीपीएन-यूएमएल आणि इतर लहान पक्षांनी रविवारी (२५ डिसेंबर) ‘प्रचंड’ यांना पाठिंबा देण्याचे मान्य केले आणि यासह, प्रचंड तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणे निश्चित झाले.
नेपाळच्या राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांना लिहिलेल्या पत्रात प्रचंड यांनी म्हटले आहे की, त्यांना पंतप्रधानपदासाठी अपक्ष खासदारांसह १६९ खासदारांचा पाठिंबा मिळाला आहे. यानंतर राष्ट्रपतींनी त्यांची नेपाळच्या पंतप्रधानपदी नियुक्ती केली. उद्या ते पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत.