31.8 C
Latur
Tuesday, May 11, 2021
Homeआंतरराष्ट्रीयहरितगृह वायू, हवा प्रदूषणामुळे वणव्यांची समस्या

हरितगृह वायू, हवा प्रदूषणामुळे वणव्यांची समस्या

एकमत ऑनलाईन

कॅलिफोर्निया : गेल्या काही वर्षात जगभरात जंगलांना वणवे लागण्याच्या घटनांत मोठी वाढ होत आहे. मानवी हस्तक्षेपामुळेच या घटना वाढत आहेत. यासंबंधी अधिक संशोधन अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठाने केले असून त्यामध्ये हरितगृह वायू व हवा प्रदुषणाच्या प्रमाणात होणारी मोठी वाढ त्याचे मुख्य कारण असल्याची माहिती उघडकीस आली आहे. नेचर या प्रसिद्ध शोधपत्रिकेत यासंदर्भातील संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांनी हे संशोधन केले आहे. संशोधकांनी १९२० पासून विविध मानवी वर्तनाचा हवामानावरील परिणामाचा अभ्यास केला. आगीचा धोका वाढविणा-या हवामानाचा वैयक्तिक परिणामाचाही वेगळा विचार केला. यापूर्वीच्या संशोधनांतूनही मानवी वर्तन आणि त्यातून निर्माण होणा-या हरित गृह वायू उत्सर्जन व हवा प्रदूषणासारख्या घटकांमुळे आगीला पूरक हवामानाचा धोका वाढत असल्याचे आढळले आहे. मात्र, त्यातील विशिष्ट घटकांचा प्रभाव अस्पष्ट होता.

संशोधक डॅनियल टॉमा म्हणाले, की जंगलामध्ये वणवा लागून तो पसरण्यासाठी योग्य हवामानाच्या स्थितीची गरज असते. त्यासाठी, गरम, कोरडे व वारे असलेले हवामान लागते. ही परिस्थिती आत्यंतिक टोकाला जाते, तेव्हा खरोखरच मोठे वणवे भडकतात. जगभरात हरितगृह वायू उत्सर्जन हा तापमानवाढीला कारणीभूत असणारा प्रमुख घटक आहे. २००५ पर्यंत या उत्सर्जनामुळे पश्चिम आणि पूर्वोत्तर अमेरिका, भूमध्य, आग्नेय आशिया व अ‍ॅमेझॉन नदीच्या खो-यात पूर्व आगीला पूरक हवामानाचा धोका २० टक्क्यांनी वाढला. मात्र, २०८० पर्यंत पश्चिम-उत्तर अमेरिका, विषुववृत्तीय आफ्रिका, नैऋ त्य आशिया व ऑस्ट्रेलियात हा अतिशय गंभीर वणव्यांचा धोका ५० टक्क्यांनी वाढेल. भूमध्य, दक्षिण आफ्रिका व अ‍ॅमेझॉनच्या खो-यात हा धोका दुप्पट असेल, असा अंदाज या संशोधकांनी व्यक्त केला आहे.

एरोसोल उत्सर्जनामुळे गंभीर समस्या
सौर किरणांना जमिनीपर्यंत पोचण्यात एरोसोल अडथळा निर्माण करतात. आग्नेय आशियात एरोसोलचे उत्सर्जन सुरूच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरड्या व वणव्याला पूरक हवामानात वाढ होऊ शकते. त्याचप्रमाणे, मॉन्सूनही कमकुवत होऊ शकतो, असे अनुमान मांडण्यात आले आहे.

जीवाश्म इंधन कारणीभूत
संशोधकांच्या मतानुसार, जीवाश्व इंधनाचे ज्वलन व जमिनीच्या वापरातील बदल या दोन घटकांचा प्रादेशिक परिणाम अधिक ठळक होत आहे. हरितगृह वायू उत्सर्जन वाढण्यासाठी त्याचा हातभार लागत आहे. विसाव्या शतकात अ‍ॅमेझॉन व पश्चिम उत्तर अमेरिकेत जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे आगीला पूरक अशा टोकाच्या हवामानात ३० टक्के वाढ झाल्याचे निरीक्षणही संशोधकांनी नोंदविले आहे.

मोहम्मद सिराजमुळे ऑस्ट्रेलिया बॅकफुटवर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या