29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeआंतरराष्ट्रीयराफेल खरेदीत घोटाळा झालेला नाही; फ्रान्सच्या डसॉल्टने फेटाळले आरोप

राफेल खरेदीत घोटाळा झालेला नाही; फ्रान्सच्या डसॉल्टने फेटाळले आरोप

एकमत ऑनलाईन

पॅरिस : मागील अनेक वर्षांपासून राफेल विमानांच्या व्यवहारात घोटाळा झाल्याचे आरोप केले जात आहेत. याचदरम्यान फ्रेंच ऑनलाईन जर्नल मीडियापार्टने काही दिवसांपूर्वी केलेल्या आरोपांची भर पडली आहे. डसॉल्टने एका भारतीय मध्यस्थाला राफेल करारामध्ये सुमारे १० लाख युरो दिल्याचा खळबळजनक दावा मिडीयापार्टने आपल्या वृत्तात केला होता. त्यामुळे या मुद्द्यावरून पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांची राळ उडाली होती. पण, डसॉल्टने असा कोणताही घोटाळा झाला नसल्याचे ठामपणे म्हटले आहे. डसॉल्टकडून फ्रान्समधील अनेक संस्थांकडून केल्या जाणा-या तपासणीचा हवाला आपल्या या दाव्यासाठी दिला आहे. त्यामुळे आता या मुद्यांवरून पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे.

आपल्या वृत्ताला फ्रान्समधील भ्रष्टाचारविरोधी कारवाया करणारी संस्था एएफएने केलेल्या तपासाचा आधार मीडियापार्टने दिल्यामुळे यामध्ये तथ्य असल्याचे बोलले जात आहे. पण डसॉल्टने हे सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. या कराराचा सरकारी अधिकारी, फ्रान्सची भ्रष्टाचारविरोधी संस्था यांनी मिळून आढावा घेतला आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार किंवा घोटाळा झाल्याचे सापडलेले नाही. भारताला ३६ राफेल विमाने देण्यासंदर्भातल्या करारात कोणताही गैरप्रकार झाला नसल्याचे डसॉल्टकडून सांगण्यात आले आहे.

डसॉल्टने भ्रष्टाचार, नैतिक तत्व, बाजारातील आपली पत राखण्यासाठी २००० सालापासूनच अंतर्गत प्रक्रिया सुरू केली आहे. ऑर्गनायझेशन फॉर इकोनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट अर्थात ओईसीडीचे सर्व नियम आणि करार आम्ही पाळतो, असे देखील कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यासंदर्भात इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या आपल्या वृत्तात ही रक्कम ज्या मध्यस्थाला देण्यात आली आहे, त्याचे नाव सुशेन गुप्ता असे सांगितले जात आहे. ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणामध्ये या व्यक्तीची आधीच चौकशी सुरू आहे. डसॉल्टच्या २०१७च्या वार्षिक अहवालाची एएफएकडून तपासणी केली जात असताना हा प्रकार समोर आल्याचे देखील मीडियापार्टने म्हटले आहे.

राज्यातील कोरोना संसर्ग चिंताजनक; पुण्यात सर्वाधिक पॉझिटिव्हिटी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या