कीव्ह : रशियाने पुन्हा एकदा युक्रेनवर आग ओकायला सुरूवात केली असून आज साठ क्षेपणास्त्रे डागतानाच विविध भागांवर ड्रोनच्या माध्यमातून हल्ले करण्यात आले. राजधानी किव्हप्रमाणेच उत्तर, दक्षिण, पश्चिम आणि मध्यवर्ती भागांतील शहरांवर हे हल्ले करण्यात आले. क्रिव्ही रिहमध्ये एका रहिवासी इमारतीवर करण्यात आलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात तिघेजण मरण पावले असून खेरसन प्रांतामध्ये एकाचा मृत्यू झाला.
युक्रेनमधील नागरी पायाभूत सुविधांना रशियाने लक्ष्य करायला सुरूवात केली आहे. उत्तरेकडील खारकिव्ह आणि अन्य भागांतील ऊर्जा पुरवठा या हल्ल्यामुळे पूर्णपणे विस्कळित झाला आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर युक्रेनचे हवाई दल सावध झाले असून या हल्ल्याची माहिती देताना प्रवक्ते युरिय इग्नात म्हणाले की, रशियाने आतापर्यंत साठ क्षेपणास्त्रे डागली आहेत. या हल्ल्यामुळे युक्रेनमधील दुस-या क्रमांकाचे सर्वांत मोठे शहर असलेल्या खारकिव्हमधील वीज पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. सुमी प्रांत देखील अंधारात बुडाला आहे. पोलतावा आणि क्रेमेनचूक ही मध्यवर्ती भागातील शहरे देखील जायबंदी झाली आहेत.
युक्रेनमधील हिवाळा अधिक तीव्र होत चालला असताना रशियाने त्याचाच फायदा घेत पायाभूत सेवांना लक्ष्य करत हल्ले करायला सुरूवात केली आहे. युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, हा ऊर्जा पुरवठा पूर्ववत व्हावा म्हणून प्रयत्न केले जात असले तरीसुद्धा परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. ऑक्टोबरपासूनचा काळ विचारात घेतला तर रशियाने युक्रेनवर एक हजारपेक्षाही अधिक क्षेपणास्त्रे डागली आहेत.
परिस्थिती युक्रेनच्या फायद्याची
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला दहा महिने पूर्ण झाले असले तरीसुद्धा अद्याप कोणीही माघार घ्यायला तयार नसल्याने परिस्थिती आणखी बिकट बनली आहे. आता नव्याने रशिया हल्ले करत पुन्हा युक्रेनविरोधात आघाडी उघडण्याची शक्यता आहे. रशियन हल्ल्याची धार तूर्त कमी झाली असल्याने ही स्थिती युक्रेनलाच फायदेशीर असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कारण याच काळात युक्रेनला युद्धसंपदा गोळा करता येईल. रशियामध्ये या युद्धावरून पुतीन हे टीकेचे धनी होऊ लागले आहेत.