ब्रुसेल्स : युक्रेनवर आक्रमण केल्याची शिक्षा म्हणून रशियाकडून या वर्षीच्या अखेरपर्यंत तेलाची आयात टप्प्याटप्प्यांत बंद करण्याचा निर्णय युरोपीय देशांनी घेतला आहे. या विषयांवर अनेक वेळा झालेल्या चर्चेनंतर आज अखेर हा निर्णय घेण्यात आला. हंगेरीचा विरोध कायम असल्याने ही आयात पूर्णपणे बंद होणार नाही.
बेल्जियमची राजधानी असलेल्या ब्रुसेल्स येथे युरोपीय महासंघाच्या सर्व २७ सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत रशियावर निर्बंधांचा सहावा टप्पा जाहीर करण्यात आला. त्यातच रशियाकडून तेलाची आयात बंद करण्याचे ठरविण्यात आले. रशियाकडून युरोपला समुद्रमार्गे आणि जमिनीखालील पाइपलाइनद्वारे तेलइंधनाचा पुरवठा होतो. यापैकी दोन तृतियांश आयात समुद्रमार्गेच होते.
ही आयात २०२२ अखेरपर्यंत बंद केली जाणार आहे. याशिवाय, पाइपलाइनद्वारे होणारा तेलपुरवठाही बंद करण्याचा निर्णय पोलंड आणि जर्मनीने घेतला असल्याने त्याचा मोठा फटका रशियाच्या अर्थव्यवस्थेला बसण्याचा अंदाज आहे. युरोपीय देशांच्या या निर्णयामुळे रशियाच्या ९० टक्के तेलनिर्यातीला फटका बसणार आहे. त्याचा परिणाम म्हणून रशियाला युक्रेनमध्ये हल्ले करण्यासाठी आवश्यक असलेला अर्थपुरवठाही कमी होणार आहे.