वॉशिंग्टन : अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएचे प्रमुख बिल बर्न्स यांनी कर्जाच्या सापळ्यात अडकलेल्या श्रीलंकेच्या सध्याच्या आर्थिक दुर्दशेसाठी चिनी मुत्सद्देगिरीला जबाबदार धरले आहे. श्रीलंकेला चीनचा डाव समजू शकला नाही असे म्हणत त्यांनी इतर देशांनी यातून धडा घेतला पाहिजे असे आवाहन केले आहे.
वॉशिंग्टनमधील अस्पेन सिक्युरिटी फोरमला संबोधित करताना सीआयएचे प्रमुख बर्न्स म्हणाले की, श्रीलंकेची चूक इतर देशांनी इशारा म्हणून घेतली पाहिजे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी सोबतच्या चर्चेत अभूतपूर्व आर्थिक संकटावर तोडगा काढण्यात श्रीलंका अयशस्वी ठरला आणि चीनच्या जाळ्यात सापडला, असे सीआयए प्रमुख म्हणाले. बर्न्स म्हणाले की, चिनी कंपन्या इतर देशांमध्ये मोठी गुंतवणूक करू शकतात, त्यासाठी त्या आकर्षक ऑफर देतात. मात्र, आज श्रीलंकेसारख्या देशांची स्थिती पाहणे आवश्यक आहे. कारण त्यांच्यावर चीनच्या प्रचंड कर्जाचा दबाव असल्याचे म्हटले आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता जगभरातील देशांना चीनसोबत कोणताही करार करण्यापूर्वी डोळे उघडे ठेवण्याचा सल्ला दिला आहे.