इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा आत्मघाती बॉम्बस्फोट झाला आहे. पोलिस व्हॅनचा स्फोट झाला आहे. यामध्ये ९ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. १५ जण जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे.
सिबी आणि कच्छी सीमेला लागून असलेल्या बलुचिस्तानच्या बोलान भागातील कांब्री पुलावर ही घटना घडली. पोलिसांनी याला फिदाईन हल्ला म्हटले आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, मोटरसायकलवरून आलेल्या आत्मघाती हल्लेखोराने पाक सुरक्षा दलांना लक्ष्य केले. परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे.
कोणीही जबाबदारी घेतली नाही
बलुचिस्तानचे मुख्यमंत्री अब्दुल कुद्दुस बिझेन्जो यांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, दहशतवादी आपला उद्देश साध्य करण्यासाठी असे हल्ले करत आहेत. ते मानवतेचा शत्रू आहेत. या घटनेची जबाबदारी आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी गटाने घेतली नसली तरी थेट आणि पहिला संशय तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान म्हणजेच टीटीपीवर आहे. कारण टीटीपीने यापूर्वीही पाकिस्तान पोलिसांवर मोठे हल्ले केले आहेत.