पेरियाकुप्पम : तामिळनाडूतील पेरियाकुप्पम येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका ९ वर्षीय मुलीने किरकोळ कारणावरून आत्महत्या केली. प्रतीक्षा नावाच्या मुलीने तिच्या पालकांनी तिला शिक्षण घेण्यास सांगितल्यावर तिने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. या नऊ वर्षांच्या मुलीला तिचे शेजारी ‘इन्स्टा क्वीन’ म्हणत.
प्रतीक्षाचे वडील कृष्णमूर्ती यांनी मुलीला सासरच्या घराजवळ खेळताना पाहून घरी जाऊन अभ्यास करण्यास सांगून घराच्या चाव्या दिल्या. यानंतर ते दुचाकीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी बाहेर गेले. रात्री ८.१५च्या सुमारास ते घरी परतले असता घराला आतून कुलूप असल्याचे पाहून त्यांनी त्यांच्या मुलीला दरवाजा उघडण्यास सांगितले.
दरवाजा न उघडल्याने मागची खिडकी तोडून ते आत गेले असता मुलगी लटकलेली दिसली. तिला तातडीने शासकीय रुग्णालयात नेण्यात आले मात्र दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी डिसेंबरमध्येही असेच एक प्रकरण समोर आले होते. उत्तर प्रदेशची राजधानी लखनोमध्ये मोबाईलवर गेम खेळण्यास नकार दिल्याने एका १० वर्षांच्या मुलाने आत्महत्या केली.