चीनी ‘आर्ट ऑफ वॉर’चा भारताला बसला फटका
नवी दिल्ली : अमेरिकन संसदेच्या अध्यक्ष नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान दौ-यामुळे चीन संतापला. तो सतत अमेरिका व तैवानला पाहून घेण्याची धमकी देत आहे. चीनची रणनीती पाहता चीन हल्ला करणार नाही. कारण, तैवानवर हल्ला करून बरेच काही साध्य करेल अशा स्थितीत स्वत:ला पाहण्यास चीन तितकासा समर्थ नाही. अशा स्थितीत त्यांनी ‘आर्ट ऑफ वॉर’अंतर्गत न लढता तैवान जिंकण्यासाचे प्रयत्न सुरू केले आहेत.
‘आर्ट ऑफ वॉर’ हा चिनी लष्करी रणनीतीकार आणि विचारवंत सन त्झू यांचा सिद्धांत आहे. ५०० वर्षांपूर्वी त्यांनी या नावाने पुस्तक लिहिले होते. या पुस्तकात शत्रूशी सामना करण्यासाठी इतकी तयारी केली पाहिजे की आपल्याला लढण्याची गरजच पडणार नाही. याचा अर्थ प्रतिस्पर्ध्यावर इतका दबाव टाका की त्याने स्वत: शरणागती पत्करावी. चीनच्या युद्ध रणनीतीवर या कलेची छाप नेहमीच दिसून आली आहे. डोकलाम, लडाख सारख्या भागात सीमेवर अतिक्रमण करून भारतासोबतचा तणाव अनेक महिने टिकवून ठेवणे आणि त्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करणे हा देखील अशाच एका रणनीतीचा भाग आहे.
दक्षिण चीन समुद्रातही चीन असेच करीत आहे. येथे जपान, व्हिएतनामसह अनेक देशांना दबावाखाली आणण्याचा प्रयत्न करीत आहे. १९६२ मध्ये भारतावर अचानक हल्ला करून त्यांनी तेच केले. याशिवाय चीनने तिबेटवर अचानक हल्ला करून तिबेटींचे बंड कमजोर केले होते.
चीन हल्ला करणार नाही
ड्रॅगन पुन्हा अशीच रणनीती अवलंबू शकतो. सध्या अमेरिकेचा वरचष्मा आहे. युद्ध झाल्यास ते चीनवर आर्थिक निर्बंध लादू शकते. त्यामुळे चीन तैवान आणि अमेरिकेला धमकी देत राहील; पण, हल्ला करणार नाही. अमेरिकी लष्कराच्या तुलनेत चीन खूप मागे आहे. अशा स्थितीत चीन काही दशकांपर्यंत आपली आर्थिक आणि लष्करी ताकद झपाट्याने वाढवेल.
सतत दबाव टाकण्याचा प्रयत्न
युक्रेन-रशिया युद्धातूनही चीन शिकला आहे. चीनला रशियाप्रमाणे तैवानमध्ये अडकायचे नाही. अशा स्थितीत सतत दबाव आणत असताना चीन स्वत:ला अशा स्थितीत ठेवायचे आहे की, अमेरिकेने तैवानमध्ये ढवळाढवळ करू नये आणि तैवानला आपल्या ताब्यात घेता यावे. हेच ‘आर्ट ऑफ वॉर’चे तत्त्व आहे.