नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारत आणि चीन दोन्ही देशांनी सीमेवर सैन्याची ज्यादा कुमक वाढवली आहे. पूर्व लडाखमध्ये दोन्ही सैन्यांमध्ये तणाव वाढल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. यापूर्वी मे ५ आणि मे ६ रोजी पँगगोंग त्सो सेक्टरमध्ये चीन आणि भारताच्या सैन्यामध्ये संघर्ष झाला होता. दरम्यान, या ठिकाणी यापूर्वीही अनेकदा तणाव वाढलेला आहे. पण सध्या चीनकडून करोना संकट असतानाच या कुरापती केल्या जात आहेत.
Read More चक्क मोरांनी केले ‘ट्रॅफिक जॅम’
सूत्रांच्या माहितीनुसार, डेमचोक, चुमार आणि दौलत बेग ओल्डी यासह गलवान व्हॅली या ठिकाणी जास्तीचे सैन्य तैनात करण्यात आलं असून सुरक्षा वाढवली आहे. नदीच्या तटावर चीनच्या सैन्याने काही बांधकाम सुरू केल्यानंतर हा प्रकार घडला. आपल्या सैन्याकडूनही चीनच्या सैन्याला आव्हान देण्यात आले, अशी माहिती सैन्यातील सूत्रांनी दिली.
मे ५ आणि मे ६ रोजी चीन आणि भारतीय सैन्यामध्ये संघर्ष झाला, ज्यात दोन्ही देशांचे अनेक जवान जखमीही झाले होते. यानंतर पँगगोंग त्सो भागात जास्तीचे सैन्य तैनात करण्यात आले होते़ १९६२ च्या युद्धातही गलवान भाग वादाचे केंद्र ठरले होते़ या वादग्रस्त भागात टेंट बांधणे, किंवा बांधकाम सुरू करणे ही गेल्या काही वर्षांपासून चीनची युक्ती आहे, असेही सूत्रांनी सांगितले.
Read More वाशिममध्ये ‘कोरोना’चा पुन्हा शिरकाव
एप्रिल-मे २०१३ मध्येही असाच संघर्ष झाला होता. यानंतर दोन्ही सैन्यांमध्ये २१ दिवस असाच लष्करी संघर्ष चालू राहिला आणि कुमक वाढवण्यात आली. चीनच्या सैन्याने भारतीय हद्दीत डीबीओ सेक्टरमधील डेपसंग बल्ज भागात १९ किमीपर्यंत घुसखोरी केली होती. याच प्रमाणे २०१८ मध्येही चीन सैन्याने टेंट बांधण्यासाठी डेमचोक सेक्टरमध्ये ३०० ते ४०० किमी घुसखोरी केली होती. दरम्यान, अशा परिस्थितीत भारतीय सैन्यालाही नाईलाजाने पुढे सरकावं लागतं. त्यामुळे संवादातून प्रश्न सुटत नाही तोपर्यंत दौन्ही सैन्यांमध्ये संघर्ष चालूच राहतो, अशी माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, यावर भारतीय सैन्याकडून कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. हे नेहमीचेच आहे, असे सांगत सैन्य प्रमुख एम. एम. नरवणे यांनी प्रतिक्रिया देणे टाळले़ एक-दोन ठिकाणचा संघर्ष आपल्यापर्यंत येतो. पण आपले सैनिक दररोज १० ठिकाणी भेटतात, असंही ते म्हणाले. कमांडर बदलल्यानंतरही असे संघर्ष होतात. आपण पहिल्या कमांडरपेक्षा वेगळे आहोत हे दाखवण्यासाठी कमांडरकडून हे केले जाते, असे सूत्रांनी सांगितले.