कॅनबेरा: वृत्तसंस्था
अमेरिकेच्या एका बायोटेक्नोलॉजी कंपनीने ऑस्ट्रेलियात कोरोना विषाणूवरील लसीची मानवावर चाचणी सुरू केली असल्याची घोषणा मंगळवारी केली; तसेच कंपनीने या वर्षअखेरपर्यंत कोरोनावरील लस तयार होण्याची आशाही व्यक्त केली आहे.
नोव्हाव्हॅक्स या बायोटेक्नॉलॉजी कंपनीचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. ग्रेगोरी ग्लेन यांनी मेलबर्न येथे नोव्हाव्हॅक्सच्या मुख्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषेदत याबद्दलची दिली. कंपनीने लसीच्या चाचणीचा पहिला टप्पा सुरू केला असून, पहिल्या टप्प्यात ऑस्ट्रेलियातील मेलबर्न आणि ब्रिस्बेनमधील १३१ स्वयंसेवकांवर याची चाचणी करण्यात येणार आहे, असे सांगितले.
Read More हॉर्न वाजवण्यास मनाई केल्याने तरुणावर कोयत्याने वार
चाचणीबरोबरच आम्ही औषधे आणि लसदेखील तयार करीत आहोत जेणेकरून या वर्षाच्या अखेरीस ते उपलब्ध होईल, असेही ग्लेन म्हणाले. तसेच, चीन, अमेरिका आणि युरोपमध्ये सुमारे १२ प्रायोगिक लसींची चाचणी सुरुवातीच्या टप्प्यात सुरू आहे; अथवा त्याची चाचणी सुरू होणार आहे. परंतु आतापर्यंत हे स्पष्ट झाले नाही की यातील कोणते औषध सुरक्षित आणि प्रभावी असेल, असेही ते म्हणाले. जगभर कोरोना विषाणूवरील लस तयार करण्यासाठी संशोधन सुरू आहे. अमेरिका, चीनसह भारतातील कंपन्याही कोरोनावरील लस तयार करण्यासाठी संशोधन करीत आहे.