कोलंबो : गोटाबया राजपक्ष यांच्या राजीनाम्यानंतरही निदर्शने सुरु ठेवलेल्या श्रीलंकेतील आंदोलकांवर सुरक्षा दलांनी गुरुवारी मध्यरात्रीपासून कारवाई सुरू केली होती. निदर्शन स्थळावर छापाच घालण्यात आला. त्यात नऊ जणांना अटक करण्यात आली. त्यावेळी झालेल्या धुमश्चक्रीत अनेक जण जखमी झाले.
रानिल विक्रमसिंघे यांनी गुरुवारी अध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यानंतर दुस-याच दिवशी कारवाईचा निर्णय घेण्यात आला. नऊ एप्रिलपासून आंदोलन सुरु होते. विक्रमसिंघे यांनी राजीनामा द्यावा अशी आंदोलकांची मागणी होती. आंदोलकांची उचलबांगडी झाल्यानंतर पंतप्रधानांचा शपथविधी आणि मंत्रिमंडळाची स्थापन अशा घडामोडी घडल्या. आता गंभीर आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी विक्रमसिंघे आणि सहकारी प्रयत्नशील असतील.
पोलिसांनी तीन सशस्त्र दले तसेच विशेष कृती दल यांच्या साथीत ही कारवाई केली. अटक करण्यात आलेले आंदोलक २६ ते ५८ वयोगटातील आहेत. अध्यक्षीय सचिवालय कार्यालयातच त्यांनी ठाण मांडले होते. मुख्य प्रवेशद्वारापाशी त्यांनी तळ ठोकला होता. आता ठसेतज्ज्ञांच्या मदतीने पुरावा गोळा करण्यात येईल. अटक करण्यात आलेल्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. कारवाईच्यावेळी शंभरपेक्षा कमी आंदोलक उपस्थित होते.
वकिलातींकडून चिंता
या कारवाईबद्दल काही देशांच्या वकिलातींकडून चिंता व्यक्त करण्यात आली. अमेरिकेच्या राजदूत ज्यूली चुंग यांनी सांगितले की, अधिका-यांनी संयम बाळगावा आणि जखमींवर तातडीने उपचार करावेत. ब्रिटनच्या उच्चायुक्त सारा हिल्टन यांनी शांततेच्या मार्गाने निदर्शने करणे महत्त्वाचे असते आणि यास आमच्या पाठिंब्याची भूमिका स्पष्ट आहे. युरोपीय महासंघाने अभिव्यक्ती स्वातंर्त्य सध्याच्या परिस्थितीत अत्यावश्यक असल्याचा मुद्दा अधोरेखित केला.
पंतप्रधानपदी गुणवर्धनेंनी कार्यभार स्विकारला
राजपक्षे कुटुंबाचे निकटवर्ती मानले जाणारे ज्येष्ठ नेते दिनेश गुणवर्धने यांची शुक्रवारी पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली. अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांनी ही नियुक्ती केली. गुरुवारी शपथविधी झाल्यानंतर त्यांनी शनिवारी कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी घेतलेला हा पहिलाच निर्णय आहे.