काठमांडू : रामचंद्र पौडेल यांनी काठमांडू येथील राष्ट्रपती भवनात नेपाळचे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली आहे. राष्ट्रपती भवनात नेपाळचे कार्यवाहक सरन्यायाधीश यांनी त्यांना शपथ दिली.
पौडेल यांचा सामना सीपीएन-यूएमएलचे सुभाषचंद्र नेमवांग यांच्याशी होता. या निवडणुकीत रामचंद्र पौडेल यांना ३३,८०२ मते मिळाली. आयोगाने सांगितले की, नेपाळी संसदेत झालेल्या निवडणुकीत फेडरल संसदेच्या ३१३ सदस्यांनी भाग घेतला. नेपाळमध्ये राजकीय अस्थिरता वाढत असताना आणि पंतप्रधान पुष्प कमल दहल यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार कमकुवत होत असताना पौडेल हे राष्ट्रपती झाले आहेत.
पौडेल हे आठ पक्षांच्या युतीचे संयुक्त उमेदवार होते. यामध्ये नेपाळी काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ- माओईस्ट सेंटर यांचा समावेश आहे. पौडेल यांना संसदेच्या २१४ आणि प्रांतीय असेंब्लीच्या ३५२ सदस्यांनी पाठिंबा दिला. २००८ मध्ये देशाला प्रजासत्ताक घोषित केल्यानंतर ही तिसरी अध्यक्षीय निवडणूक होती. नेपाळच्या मावळत्या राष्ट्रपती बिद्या देवी भंडारी यांचा कार्यकाळ एक दिवस आधीच संपला आहे.