बीजिंग : वृत्तसंस्था
चीनच्या जिलिन आणि हिलांगजियांग प्रांतात गेल्या काही आठवड्यांच्या काळात कोरोना व्हायरसचे नवे क्लस्टर समोर आलेले आहेत. येथील रुग्णांमध्ये सामान्य कोरोना रुग्णांप्रमाणे कुठलीही लक्षणे आढळून येत नसल्याने येथील संक्रमण अधिक भयावह मानले जात आहे. विशेष म्हणजे येथे विषाणूचा इनक्युबेशन कालावधी वाढलेला असल्याचे आढळून आले आहे. भारतासह जगातील अन्य देशांत अॅसिम्प्टोमॅटिक रुग्ण आढळत आहेत. निगेटिव्ह न्यूक्लिक अॅसिड टेस्टच्या माध्यमातून कोरोना विषाणू वुहानमधील त्याच्या अवस्थेपेक्षा अधिक शक्तिशाली अवस्थेत पोहोचला आहे, असा निष्कर्षही काढण्यात आला आहे.
Read More डोकलामनंतर पहिल्यांदाच भारत-चीनमध्ये मोठ्या संघर्षाची शक्यता
वुहानमधून उद्भवलेल्या कोरोना विषाणूने जगभरात उच्छाद मांडलेला असताना काही आठवड्यांपासून चीनमध्ये विषाणूची दुसरी लाट येण्याचे संकेत मिळत आहेत. पण आता विषाणूचा एकूण व्यवहार आणि संक्रमणातील लक्षणांमध्ये बदल झालेले दिसत आहेत. चिनी वृत्तसंस्थेच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आलेले असून विषाणू जितका फैलावत आहे, तितकाच त्याच्यात बदल घडत आहे, असे त्यात म्हटले आहे. वुहानसह हुबेईमध्ये उद्भवलेला, फोफावलेला कोरोना विषाणू आणि उर्वरित चीनमध्ये आता आढळत असलेला कोरोना विषाणू या दोहोंमध्ये कमालीचा फरक आहे, असे चीनमधील राष्ट्रीय आरोग्य आयोगातील तज्ज्ञांच्या चमूतील एक असलेले डॉ. कुई हेईबो यांचे म्हणणे आहे.
वुहानमधील प्रकरणांशी नव्या रुग्णांची तुलना केली असता हा विषाणू जगभरात जितका पसरतो आहे, तितकी त्याची नवनवी रूपे बघायला मिळत आहेत. कोरोना जणू परीकथांमधील रूप बदलणारा राक्षसच आहे. अॅसिम्प्टोमॅटिक रुग्ण कुटुंबातील इतरांसाठी अधिक घातक ठरत असल्याने असे रुग्ण आढळणे चिंताजनक आहे.