19.8 C
Latur
Monday, December 5, 2022
Homeआंतरराष्ट्रीयजगावर अन्नटंचाईची टांगती तलवार

जगावर अन्नटंचाईची टांगती तलवार

एकमत ऑनलाईन

जीनिव्हा : जगावर आता एक संकट आहे आणि त्याच्या मुळात आणखी एक संकट आहे, त्यामुळे सर्व देशांनी आताच सावध व्हावे आणि उपाययोजना करावी, असा इशारा संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न कार्यक्रमाचे कार्यकारी संचालक डेव्हिड बिस्ली यांनी दिला आहे.

खतांचा पुरवठा अत्यंत विस्कळीत झाल्याने अन्नधान्य उत्पादनाचे संकट उभे राहिले असून हा पुरवठा सुरळीत केला नाही तर, पुढील वर्षी जगभरात अन्नटंचाईचे मोठे संकट नि­श्चितपणे येईल, असा इशारा बिस्ली यांनी दिला आहे.
डेव्हिड बिस्ली यांनी जगाला परिस्थितीची जाणीव करून दिली. पाच वर्षांपूर्वी जगातील साधारण आठ कोटी लोकांसमोर उपासमारीची समस्या होती. यात आता चौपटीने वाढ झाली आहे.

एक संकट कायम असतानाच त्यात नव्या संकटांची भर पडत गेल्याने ही संख्या वाढल्याचेही बिस्ली यांनी सांगितले. सध्या ४५ देशांमधील एकूण पाच कोटी लोक तीव्र दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहेत. आपण या लोकांपर्यंत आताच पोहोचून त्यांना मदत केली नाही तर, दुष्काळ, भूकबळी, अस्थिरता, स्थलांतर असे चक्र सुरु होईल, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली.

खत पुरवठ्याची स्थिती
युक्रेनमधून दरवर्षी ४० कोटी लोकांना पुरेल इतक्या अन्नधान्याची निर्यात होते. रशिया हा खतांचा दुस-या क्रमांकावरील मोठा निर्यातदार देश आहे. हे दोन्ही देश एकमेकांशी युद्धात गुंतल्याने निर्यात थांबली आणि अन्नधान्य तसेच खतांचा पुरवठा थांबला गेला. खतांचा पुरवठा नसल्याने अनेक देशांमधील पीकांवर परिणाम होणार असून त्याचा फटका पुढील वर्षीच्या अन्नधान्य उत्पादनावर होणार आहे. तीव्र अन्नटंचाई असलेले देश
आफ्रिका खंड, इराण, येमेन, बांगलादेश, अफगाणिस्तान, इंडोनेशिया, श्रीलंका, चिली.

खत टंचाईमुळे खाद्यान्न घटणार
सध्या जगभरात एकूण सात अब्ज ७० कोटी लोकांना पुरेल इतक्या अन्नधान्याचे उत्पादन होते. मात्र, यापैकी ५० टक्के उत्पादन हे खतांच्या जोरावर होते. खतांच्या वापराशिवाय पुढील वर्षी उत्पादन पुरेसे होणार नाही. खतांचा सर्वांत मोठा उत्पादक असलेल्या चीनने खतनिर्यात बंद केली आहे, तर रशियावरच निर्बंध असल्याने त्यांची खते बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यास अडचणी येत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या