24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeआंतरराष्ट्रीयराणीची संपत्ती गोपनीयच राहणार

राणीची संपत्ती गोपनीयच राहणार

एकमत ऑनलाईन

लंडन : जगातील सर्वांत श्रीमंत महिलांपैकी एक समजल्या गेलेल्या दिवंगत राणी एलिझाबेथ द्वितीय यांची संपत्ती नेमकी किती आहे आणि त्यांनी त्यांच्या मृत्युपत्रात संपत्तीचे वाटप कसे केले आहे, हे कायम गोपनीयच राहणार आहे. ब्रिटिश राजघराण्याने सरकारसोबत केलेल्या करारानुसार या बाबी जाहीर केल्या जाणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

राणी एलिझाबेथ यांचे गुरुवारी (ता. ८) निधन झाल्यानंतर त्यांच्या संपत्तीबाबत चर्चा सुरु झाली आहे. ‘ब्रँड फायनान्स’ या कंपनीने २०१७ मध्ये केलेल्या मूल्यांकनानुसार ब्रिटिश राजघराण्याची एकूण संपत्ती ८८ अब्ज डॉलर इतकी आहे. राणी एलिझाबेथ यांनी केलेली गुंतवणूक, कलात्मक वस्तू, दागिने, स्थावर मालमत्ता हे सर्व धरून त्यांची वैयक्तिक मालमत्ता ५० कोटी डॉलर असावी, असा ‘फोर्ब्ज’चा अंदाज आहे. मात्र, ती याहून अधिक असावी, असा अनेकांचा दावा आहे.

सर्वाधिक उत्पन्न डची ऑफ लँकेस्टरमधून
राणीला सर्वाधिक उत्पन्न डची ऑफ लँकेस्टर या खासगी स्थावर मालमत्तेतून मिळते. ब्रिटिश राजघराण्याला खर्चासाठी उत्पन्न मिळावे, यासाठीच हे वतन म्हणून राजघराण्याला दिलेले आहे. या स्थावर मालमत्तेची एकूण किंमत ६५ कोटी २० लाख पौंड असून या वर्षी त्यातून अडीच कोटी पौंड उत्पन्न मिळाले.

संपत्तीवर कोणताही कर नाही
१९९३ मध्ये तत्कालीन सरकारबरोबर झालेल्या करारानुसार, राजघराण्यातील व्यक्तींना वारसा हक्काने मिळालेल्या संपत्तीवर कोणताही कर लावला जात नाही. मात्र, त्याच वर्षीपासून प्राप्तिकर भरण्याचे मात्र राणीने मान्य केले होते. इतर संपत्ती मात्र खासगीपणा जपण्यासाठी गोपनीय ठेवण्याचे सरकारने मान्य केले. राजघराण्याच्या प्रत्येक सदस्याची संपत्ती गोपनीयच ठेवली जाते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या