मास्को : एकीकडे रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असताना भारत देशाला रशियाकडून एस-४०० मिसाईल डिफेन्स सिस्टिम वेळेवर आणि कोणताही अडथळा न येऊ देता पुरवल्या जातील, असे विधान रशियन राजदूत डेनिस अलिपोव यांनी केले आहे. भारत आणि रशिया यांच्यातील राजनैतिक संबंधाला या वर्षी ७५ वर्षे झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर रशियामधील डायजेस्ट या नियतकालीकात अलिपोव यांनी वरील भाष्य केले.
भारताने २०१८ साली एस-४०० एअर मिसाईल डिफेन्स सिस्टिम्सच्या खरेदीसाठी ५ मिलियन अमेरिकी डॉलर्सचा रशियासोबत करार केला होता. या करारांतर्गत भारताला ५ एस-४०० एअर मिसाईल डिफेन्स सिस्टिम्स मिळणार होत्या. मात्र मागील काही महिन्यांपासून युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्ध सुरु आहे. तसेच अमेरिकेसह अनेक देशांनी रशियावर आर्थिक तसेच विविध निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे या मिसाईल सिस्टिम्सचा भारताला पुरवठा होण्यास विलंब होऊ शकतो, अशी शंका उपस्थित केली जात होती. मात्र आता रशियाचे राजदूत अलिपोव यांनी भारताला या एस-४०० एअर डिफेन्स मिसाईल सिस्टिम्सचा पुरवठा वेळेत होईल, असे सांगितले.