सोल : जगाशी फटकून राहणा-या उत्तर कोरियाने गेल्या वर्षात सर्वधिक क्षेपणास्त्र चाचण्या केल्यानंतर नव्या वर्षातही याच मार्गावर चालण्याचा निश्चय या देशाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन यांनी केल्याचे त्यांनी घेतलेल्या निर्णयांवरून दिसून आले आहे.
देशाच्या अण्वस्त्र साठ्यात वेगाने वाढ करण्याचा आणि नवीन, अधिक शक्तीशाली आंतरखंडिय बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे विकसित करण्याचा आदेश किम यांनी आपल्या अधिका-यांना दिला आहे. उत्तर कोरियाची अण्वस्त्र क्षमता वाढविण्याचा इशारा किम जोंग उन यांनी यापूर्वी वारंवार दिला आहे. त्याच धोरणाला अनुसरून त्यांनी आज आपल्या अधिका-यांना नवीन क्षेपणास्त्र विकसीत करण्याचा आदेश दिला आहे. आपले सामर्थ्य वाढवून त्या बळावर बड्या देशांना वेठीस धरत निर्बंध कमी करण्याचा उत्तर कोरियाचा अंतस्थ हेतू असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. किम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सत्ताधारी पक्षाच्या बैठकीत त्यांनी, देशाची स्वायत्तता, सुरक्षा आणि हित जपण्यासाठी लष्करी ताकद वाढविण्याचे आदेश आपल्या अधिका-यांना दिले. यावेळी किम यांनी दक्षिण कोरिया आणि अमेरिका या त्यांच्या दोन प्रमुख शत्रू देशांवर जोरदार टीका केली.
उत्तर कोरीयाला सावध राहावे लागणार
अमेरिकेच्या मदतीने दक्षिण कोरियाने सीमेवर तणाव निर्माण केल्यानेच उत्तर कोरियाला सावध रहावे लागत आहे असा दावा किम यांनी केला. दक्षिण कोरियाने अमेरिका आणि जपानच्या साह्याने उत्तर कोरियाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरु केला असल्याचाही आरोप किम यांनी केला.