‘नीलम-झेलम को बहने दो, हमें जिंदा रहने दो’
जम्मू (वृत्तसंस्था) : पाकव्याप्त काश्मीरमध्ये एका चिनी कंपनीच्या मदतीने बांधण्यात येणा-या धरणांना स्थानिकांनी विरोध केला आहे. नीलम-झेलम नदीवर बांधण्यात येणा-या धरणांना विरोध करण्यासाठी स्थानिकांनी सोमवारी रात्री येथे रस्त्यावर उतरुन मशाली घेऊन आंदोलनही केलं. पाक व्याप्त काश्मीरमधील मुजफ्फराबाद शहरामध्ये शेकडोच्या संख्येने लोकं रस्त्यावर उतरल्याचे पहायला मिळालं. हातात मशाल घेऊन हे लोक, ‘दरिया बचाओ, मुजफ्फराबाद बचाओ’ आणि ‘नीलम-झेलम को बहने दो, हमें जिंदा रहने दो’ अशा घोषणा देत होते.
पाकिस्तान आणि चीनने नुकताच पाक व्याप्त काश्मीरमध्ये हायड्रोपॉवर प्रोजेक्ट उभारणीसंदर्भात करार केला आहे. आजाद पत्तन असं या प्रकल्पाचे नाव आहे. या प्रकल्पाअंतर्गत चिनी कंपनी झेलम आणि नीलम नदीवर मोठी धरणे बांधून ७०० मेगावॅट वीज निर्माण करणार आहे. या प्रकल्पाचे कंत्राट चिनी कंपनीला देण्यात आले आहे. हा बंधारा म्हणजे चीनच्या महत्वकांशी योजनेचा एक भाग असल्याचे सांगण्यात येत आहे.
या प्रकल्पासाठी पाकिस्तानने ७५ टक्के म्हणजेच १.१३ अब्ज डॉलरचे कर्ज घेतले आहे. तर २५ टक्के रक्कम ही इक्विटीच्या माध्यमातून उपलब्ध करुन हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे. पाकिस्तानने हे कर्ज फेडण्यासाठी १८ वर्षांची मुदत मागितली आहे.
भारताने या वादग्रस्त भूभागावर धरणे बांधण्यास विरोध केला आहे. पाक व्याप्त काश्मीरमधील स्थानिक नागरिकांनाही या प्रकल्पाला विरोध केला आहे. मात्र पाकिस्तानमधील इम्रान खान सरकारने सर्वांचा विरोध झुगारुन, स्थानिकांना विश्वासात न घेता या प्रकल्पाला हिरवा झेंडा दाखवला आहे. या ठिकाणी चीनने धरण बांधल्यानंतर येथील प्रदेशावर चीनचा प्रभाव वाढेल आणि स्थानिकांसमोर आणखीन अडचणी निर्माण होतील अशी भिती येथील नागरिकांना वाटत आहे.
संजय दत्त फुफ्फुसांच्या कॅन्सरवरील उपचारांसाठी न्यूयॉर्कला जाण्याच्या तयारीत