वॉशिंग्टन : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील जगातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक असणा-या गुगलच्या मालकीच्या यूटयूबने बुधवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अकाऊंटवर तात्पुरत्या स्वरुपाची बंदी घातली आहे. ट्रम्प यांच्या चॅनेलवरुन अपलोड करण्यात आलेला व्हिडीओ हा हिंसेला प्रोत्साहन देत असल्याचे कारण देत यूटयूबने ही कारवाई केल्याचे म्हटले आहे.
सध्या सुरु असणा-या राजकीय हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आम्ही डोनाल्ड जे. ट्रम्प यांच्या चॅनेलवरुन अपलोड करण्यात आलेला नवीन कंटेट (व्हिडीओ) काढून टाकला आहे. हा कंटेट आमच्या धोरणांचे उल्लंघन करणारा आहे, असे यूटयूबने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये म्हटले आहे. या चॅनेलवरुन आता किमान सात दिवस नवीन कंटेट अपलोड करता येणार नाही, असेही कंपनीने पत्रकामध्ये स्पष्ट केले आहे. याचाच अर्थ ट्रम्प आता अध्यक्षपदावर असतानाच यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून कोणताही व्हिडीओ अपलोड करु शकत नाहीत. २० जानेवारी रोजी म्हणजेच सात दिवसांनी अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणार आहे.
अनेक कंपन्यांनी बहिष्कार टाकण्यास सुरुवात
अमेरिकेच्या संसदेवरील हल्ल्यानंतर जागतिक महासत्तेचे मावळते अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांच्यावर आता उद्योग जगतानेही बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली आहे. स्ट्राईप, शॉपिफायसारख्या ई-कॉमर्स कंपन्यांसह अमेरिकेतील आघाडीच्या अनेक कंपन्यांनी ट्रम्प यांच्याशी संबंधित कंपन्यांच्या सेवा नाकारण्याचे पाऊल उचलले आहे. यापूर्वीच ट्रम्प यांचे खाते ट्विटरने बंद केले होते. फेसबुक, इन्स्टाग्रामनेही ट्रम्प यांचे खाते बंद केले. फेसबुकचे कार्यकारी अध्यक्ष मार्क झुकेरबर्क यांनी ट्रम्प यांना काहीही पोस्ट करण्याची परवानगी देणे धोकादायक ठरु शकते, असे म्हटले होते़
आत्महत्येची चिठ्ठी लिहून शेतकरी बेपत्ता