वॉशिंग्टन : जागतिक पुरवठा साखळीत होत असलेला बदल पाहता जगातील सर्व प्रमुख देश बचावासाठी धडपड करु लागले आहेत. अमेरिका तैवानबरोबर आर्थिक संबंध मजबूत करण्याचा प्रयत्न करित आहे, असे अमेरिकेकडून सांगण्यात आले आहे. हे सर्व अशा वेळी होत आहे, जेव्हा चीनने अमेरिकेला तैवानशी संबंध न वाढवण्याचा इशारा दिला आहे. नुकतेच जपानमध्ये क्वाड परिषदेत अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांनी जर चीनने तैवानवर हल्ला केल्यास अमेरिका प्रत्यक्षपणे तैवानबरोबर असेल, असा स्पष्ट निर्वाळा देत चीनला कारवाईचा इशारा दिला होता.
आकड्यानुसार वर्ष २०२० मध्ये दोन्ही देशांदरम्यान १०५.९ बिलियन डॉलर वस्तू व सेवांचा व्यापार झाला. त्यातून तैवानने अमेरिकेतून ३९.१ बिलियन डॉलरचे वस्तू व सेवा खरेदी केले. दुसरीकडे अमेरिकेने तैवानकडून ६६.७ बिलियन डॉलरची आयात केली. अमेरिका प्रामुख्याने तैवानला यंत्र, इलेक्ट्रिक मशिनरी, नैसर्गिक इंधन, ऑप्टिकल अँड मेडिकल इंस्ट्रमेंट आणि विमाने विकतो. तैवानकडून अमेरिका इलेक्ट्रिक मशिनरी, मशिनरी, वाहने, स्टील आणि प्लास्टिक खरेदी करतो.