नवी दिल्ली : भारतातच नाही तर अमेरिका, ब्रिटनसारख्या देशांनाही महागाईच्या दराने त्रस्त केले आहे. भारतात एप्रिल महिन्यांत किरकोळ महागाईचा दर ७ टक्क्यांवर पोचला. मार्च महिन्यांत हाच दर ६.९५ टक्के होता. पुढील महिन्यांत म्हणजेच जून महिन्यांत आरबीआयकडून रेपो रेटमध्ये वाढ होण्याची शक्यता अर्थतज्ज्ञ व्यक्त करत आहेत. त्यामुळे महागाई आणखी वाढेल, अशी शक्यता आहे. अमेरिका, ब्रिटनसारख्या श्रीमंत देशांना देखील महागाईची झळ बसत आहे.
ब्रिटनमध्ये महागाईचा दर एप्रिल महिन्यांत ९ टक्क्यांवर पोचला आहे. हा दर १९८२ नंतर सर्वाधिक आहे. वाढत्या महागाईमुळे ब्रिटनचे लोक हैराण झाले आहेत. युरोपातील सर्वात मोठ्या पाच अर्थव्यवस्थेत ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेचा समावेश आहे. परंतु तेथे महागाईची झळ बसत असून अर्थमंत्री ऋषी सुनक महागाईची झळ कमी करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
ते म्हणाले, की आम्ही नागरिकांना जागतिक आव्हानांपासून पूर्णपणे वाचवू शकत नाही. परंतु त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करीत आहोत. महागाई कमी करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यासाठी तयार आहोत असे त्यांनी नमूद केले. ब्रिटनमध्ये महागाई भडकण्यामागे कच्चे तेलाचे कारण सांगितले जात आहे. युक्रेनवरील हल्ल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे केवळ ब्रिटन आणि भारतच नाही तर जगभरातील पेट्रोल, डिझेलच्या किमतीत वाढ झाली आहे. ब्रिटनमध्ये भाजीपाला, अन्नधान्याच्या किमती वाढल्या आहेत.