23.2 C
Latur
Wednesday, June 16, 2021
Homeआंतरराष्ट्रीयलस होणार पेटंटमुक्त, उत्पादनवाढीला बळ!

लस होणार पेटंटमुक्त, उत्पादनवाढीला बळ!

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन : जगभरात पसरलेल्या कोविड-१९ साथीला आळा घालण्यासाठी जलदगतीने लसीकरण करणे हाच प्रभावी उपाय आहे. त्यासाठी लस उत्पादन वाढवणे अत्यावश्यक आहे. या पार्श्वभूमीवर लस निर्मितीला गती देण्यासाठी व्यापारासंबंधित बौद्धिक संपदा हक्क कायद्यातील काही तरतुदी रद्द करण्याच्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या प्रस्तावाला पाठिंबा देण्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी केली. त्यामुळे जगभरात लसींचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करणे शक्य होणार आहे.

बौद्धिक संपत्ती हक्क कायद्याचे संरक्षण असणा-या काही तरतुदी स्थगित करण्याचा प्रस्ताव भारत आणि दक्षिण आफ्रिका यांनी जागतिक व्यापार संघटनेकडे मांडला आहे. त्याला आता अमेरिकेने पाठिंबा दिल्याने जगभरातील औषध उत्पादकांच्या या लस उत्पादनासंदर्भातील काही गोपनीय बाबी खुल्या होणार असून, यातून लस निर्मितीतील अडथळे दूर होणार आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिकेत या साथीचा फैलाव प्रचंड असल्याने जो बायडन यांच्या प्रशासनाने ही भूमिका घेतली असल्याचे अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधी कॅथरीन यांनी स्पष्ट केले.

जगभरात निर्माण झालेल्या या भीषण आरोग्य संकटामुळे अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे यावर उपाययोजना करतानाही विशेष योजना राबविण्याची गरज आहे, असे त्यांनी एका निवेदनात म्हटले आहे. बायडेन प्रशासनाचा बौद्धिक संपदा संरक्षणाला ठाम पाठिंबा आहे; परंतु या साथीच्या रोगावर मात करण्यासाठी सध्याच्या काळात लस निर्मिती आवश्यक असल्याने हे प्रशासन या प्रस्तावाला मान्यता देत आहे, असे कॅथरिन ताइ यांनी स्पष्ट केले.

अन्य देशांतील कंपन्यांना लसनिर्मिती करता येणार
करोना महामारीच्या परिस्थितीत आपल्या पेटंट व बौद्धिक संपदेसंबंधीच्या अधिकारातील काही तरतुदी तात्पुरत्या हटवण्याचा निर्णय बायडन यांनी घेतला आहे. त्यामुळे अमेरिकी कंपन्यांच्या संशोधनाच्या आधारे अन्य देशांतील कंपन्यांना लसनिर्मिती करता येणार आहे. जीनिव्हा येथे सध्या सुरू असलेल्या जागतिक व्यापार संघटनेच्या बैठकीत यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

१०० हून अधिक देशांचा पाठिंबा
नोबेल पारितोषिक विजेते संशोधक आणि जगातील माजी नेत्यांचा समावेश असलेल्या १७५ मान्यवरांच्या गटानें कोविड लसींसाठी बौद्धिक संपदा संरक्षण हक्क निलंबित करण्यासाठी त्वरित निर्णय घेण्याची मागणी करणारे पत्र अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांना लिहिले होते. भारत आणि दक्षिण आफ्रिकेने जागतिक व्यापार संघटनेकडे याबाबतचा प्रस्ताव दिल्यानंतर काही दिवसांनीही पत्र मोहीम सुरू करण्यात आली. ऑक्टोबर २०२० मध्ये पहिल्यांदा मांडलेल्या या प्रस्तावाला १०० हून अधिक देशांचा पाठिंबा लाभला आहे.

पेटंटमुळे ४३ टक्केच उत्पादन क्षमतेचा वापर
सध्या जगभरात कोविड-१९ प्रतिबंधासाठी एकूण ८ लसी वापरल्या जात आहेत. कोणताही देश या सर्व लसी वापरत नाही; परंतु श्रीमंत देशांत आगाऊ ऑर्डर देऊन ३ किंवा ४ लसी मिळवल्या जात आहेत. बरेचसे लस उत्पादकदेखील याच देशांमध्ये असून, त्यांच्याकडे या लसींचे पेटंट असल्याने ते इतरांना त्याचे उत्पादन करू देत नाहीत. यामुळे बड्या औषध निर्मात्या कंपन्यांची मक्तेदारी निर्माण झाली असून, जगातील इतर उत्पादकांना वैज्ञानिक माहिती साठा, तंत्रज्ञान दिले जात नाही. यामुळे सध्या जागतिक क्षमतेच्या केवळ ४३ टक्केच उत्पादन क्षमता वापरली जात आहे.

लस पेटंटमुक्त केल्यास उत्पादनवाढीस चालना
पंतप्रधानांचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार डॉ. के. व्ही. विजय राघवन यांनी कोरोना विषाणूच्या संक्रमणाची तिसरी लाट अपरिहार्य असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे लसींचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करणे आणि लसींचा साठा वाढवणे हा ही लाट रोखण्याचा एकमेव मार्ग आहे. त्यामुळं पेटंट्सच्या संदर्भातील अडथळे दूर केले तर सर्वांना परवडतील अशा आणि मोठ्या प्रमाणात लस निर्माण करणे शक्य होईल.

संगीतकार वनराज भाटिया यांचे निधन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या