टेस्ला आणि स्पेसएक्स सारख्या कंपनीचे सीईओ इलॉन मस्क यांनी आज ५१ व्या वर्षात पदार्पण केले. लहानपणी व्हिडिओ गेम्सचा शोध लावणारा ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनण्यापर्यंतचा इलॉन मस्कचा प्रवास खूप रंजक आहे.
इलॉन मस्क यांचा जन्म २८ जून १९७१ रोजी दक्षिण आफ्रिकेतील प्रिटोरिया येथे झाला. त्याचे पूर्ण नाव इलॉन रीव्ह मस्क आहे. त्याची आई कॅनडाची होती तर वडील दक्षिण आफ्रिकेचे होते. वडील एरोल मस्क इलेक्ट्रिकल इंजिनिअर आणि पायलट होते, तर आई मे मस्क डायटीशियन होत्या.
आई वडिलांच्या घटस्फोटानंतर इलॉन मस्क आपल्या वडिलांसोबत राहू लागला. त्यांचे सुरवातीचे शिक्षण दक्षिण आफ्रिकेत झाले. यानंतर उच्च शिक्षणासाठी १९८८ मध्ये कॅनडाचा पासपोर्ट मिळवून त्यांनी दक्षिण आफ्रिका सोडली.
मस्कने फिलाडेल्फिया येथील पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून भौतिकशास्त्र आणि अर्थशास्त्रात पदवी मिळवली आणि कॅलिफोर्नियाला गेले. येथे त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठात पीएचडीसाठी हजेरी लावली, परंतु ती पूर्ण केली नाही. मस्कला लहानपणापासून संगणकाची आवड होती आणि वयाच्या १० व्या वर्षी त्याने कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग शिकून घेतले. यानंतर वयाच्या १२ व्या वर्षी त्याने ‘ब्लास्टर’ नावाचा व्हिडिओ गेम बनवून त्यातून कमाई करण्यास सुरुवात केली. मस्कने त्याचा तयार केलेला व्हिडिओ गेम एका अमेरिकन कंपनीला फक्त $500 मध्ये विकला.
व्हिडीओ गेम्स बनवण्यास सुरुवात केल्यानंतर एलोन मस्कने मागे वळून कधीच पाहिले नाही. वयाच्या २७ व्या वर्षी मस्कने एक्स.कॉम नावाची कंपनी सुरू केली. १९९५ मध्ये झिप२ नावाची टेक कंपनी स्थापन केली. यानंतर २००४ मध्ये त्यांनी टेस्ला ही इलेक्ट्रिक कार कंपनी सुरू केली.
सध्या टेस्ला ही जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार कंपनी आहे. यासोबतच मस्क हे स्पेस एक्स चे सीईओ देखील आहेत. अलीकडेच, त्यांनी जवळपास ३ लाख ४५ हजार कोटींहून अधिक किमतीमध्ये ट्विटर विकत घेण्याचा करार केला आहे, जो टेक जगतातील आतापर्यंतचा तिसरा सर्वात मोठा करार आहे.
फोर्ब्सच्या रिअल टाईम अब्जाधीशांच्या आकडेवारीनुसार इलॉन मस्क २३४ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. एकेकाळी मस्कला इंटरनेट कंपनीने नोकरी नाकारली होती आणि आज तो जगाला सॅटेलाइट इंटरनेट देत आहे. मंगळ ग्रहावर इलॉनला मानवी वस्ती स्थापन करायची आहे. इलॉनचे इंटरनेटबद्दल वेगळे मत होते आणि ते म्हणाले की, इंटरनेटमध्ये जग बदलण्याची क्षमता आहे.