17.5 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeआंतरराष्ट्रीयव्हॉटसअ‍ॅपची सेवा दीड तास कोलमडली

व्हॉटसअ‍ॅपची सेवा दीड तास कोलमडली

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : जगात संवादाचे सर्वात मोठे माध्यम असलेली व्हॉट्सअ‍ॅपची सेवा मंगळवारी दुपारी भारतासह जगभरातील अनेक देशांत कोलमडली. त्यामुळे जगभरातील अनेक ठिकाणच्या युजर्सचा खोळंबा झाला. यासंबंधीच्या वृत्तानुसार व्हॉट्सअ‍ॅपची सेवा दुपारी १२.३० च्या सुमारास विस्कळीत झाली. जवळपास दीड तासानंतर दुपारी २ वाजून ६ मिनिटांनी ती पूर्ववत झाली. त्यानंतर अक्षरश: तक्रारींचा पाऊस पडला. केंद्र सरकारने यासंबंधीची दखल घेऊन व्हॉट्सऍपची पॅरेंट कंपनी मेटाकडून यासंबंधीचा अहवाल मागवला.

भारतात महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेशासह अनेक शहरांतील वापरकर्त्यांनी याची तक्रार मेटा-ओन्ड कंपनीकडे केली होती. वेबसाइट ट्रॅकर डाउन डिटेक्टरनुसार ३ हजारांहून अधिक लोकांनी यासंबंधीची तक्रार नोंदवली. व्हॉट्सऍप सर्व्हर डाउन झाल्याची बातमी ट्विटरवरही ट्रेंड करत होती. जगभरात व्हॉट्सऍपचे २ अब्जांहून अधिक मासिक वापरकर्ते आहेत.

व्हॉट्सऍप बंद झाल्याची बातमी दुपारी १२.३० च्या सुमारास आली. आउटेज ट्रॅकिंग कंपनी डाउन डिटेक्टरवर ६७ टक्के लोकांनी मेसेज सेंड करण्यात अडचण येत असल्याची तक्रार नोंदवली. सेवा बंद झाल्याच्या एका तासानंतर व्हॉट्सऍपची पॅरेंट कंपनी मेटाचा प्रवक्ता म्हणाला की, काही लोकांना संदेश पाठवण्यात अडचण येत असल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. कंपनी लवकरात लवकर सेवा पूर्ववत करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, कंपनीने या तांत्रिक बिघाडाचे कोणतेही कारण दिले नव्हते. त्यामुळे नेमके कोणत्या कारणामुळे व्हॉटसअ‍ॅपची सेवा बंद झाली, हे कळू शकले नाही. दरम्यान, केंद्र सरकारने यासंबंधीची दखल घेऊन संबंधित कंपनीकडून अहवाल मागवला आहे.

डाउन डिटेक्टरवर येणा-या अडचणींविषयी एका तक्रारकर्त्याने लिहिले की, लॅपटॉपसोबत सिंक करण्यासाठी व्हॉटसअ‍ॅपचा क्यूआर कोड कनेक्ट होत नाही. मेसेज सेंडही होत नाही. तत्पूर्वी, दिल्ली, लखनौ, कोलकाता, मुंबईसह अनेक शहरांतील वापरकर्त्यांनी ही मेसेजिंग सेवा काम करीत नसल्याची तक्रार केली होती. अनेक वापरकर्त्यांनी मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर मेसेज पाठवण्यात व रिसिव्ह करण्यात अडचणी येत असल्याचे सांगितले. व्हॉट्सऍप मेसेजिंग सर्व्हिसचे मेटा कंपनीकडून संचलन केले जाते. हीच कंपनी फेसबुक व इंस्टाग्रामचीही ओनर आहे.

गतवर्षी ४ ऑक्टोबरला ६ तास बंद होती सेवा
फेसबुक, इंस्टाग्राम व व्हॉट्सऍप प्लॅटफॉर्म गतवर्षी ४ ऑक्टोबर रोजी संपूर्ण जगभरात जवळपास ६ तासांसाठी ठप्प झाले होते. यामुळे अब्जावधी वापरकर्त्यांना अडचणींचा सामना करावा लागला होता. ही समस्या रात्री ९.१५ च्या सुमारास उद्भवली होती. या आउटेजचा थेट फटका अमेरिकन बाजारपेठेतील फेसबुकच्या शेअर्सना बसला होता. कंपनीचे शेअर्स ६ टक्क्यांपर्यंत कोसळले होते. जगभरात फेसबुकचे २.८५ अब्ज मासिक सक्रिय वापरकर्ते आहेत, तर व्हॉट्सऍपचे 2 अब्ज आणि इंस्टाग्रामचे १.३८ अब्ज युजर्स आहेत.

मीम्सचा पाऊस
मंगळवारी दुपारी जगात अनेक ठिकाणी व्हॉट्सअ‍ॅप सेवा बंद पडली. मात्र, कंपनीकडून याबाबत कोणतेही अधिकृत कारण सांगितले गेले नाही. त्यामुळे जगभरातल्या कोट्यवधी युजर्सचा खोळंबा झाला. व्हॉट्सअ‍ॅप डाऊननंतर अनेकजण त्रस्त झाले. त्यानंतर नेटक-यांनी मीम्सचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या