ब्राझिलिया : कोरोनाचा फटका भारत, अमेरिकेसह ब्राझीललाही मोठा बसला आहे. सध्या सगळे जग लसीच्या भरवशावर व प्रतिक्षेत असताना ब्राझीलचे राष्ट्रपती जेअर बोलसोनारो यांनी मात्र आपण लस घेणार नाही, असे वक्तव्य केले आहे.
बोलसोनारो यांनी केलेल्या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. बोलसोनारो यांनी यापूर्वीही अनेक वेळा कोरोनाच्या लसीकरण कार्यक्रमाबद्दल संशय व्यक्त केला आहे. बोलसोनारो यांनी गुरुवारी रात्री अनेक सोशल मीडियावर थेट प्रक्षेपण सुरू असताना हे विधान केले आहे. रॉयटर्सने याबद्दल वृत्त दिले आहे.
बोलसोनारो यांनी मास्क वापरण्याच्या उपयुक्ततेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ‘कोरोनाचा प्रसार रोखण्यात मास्क प्रभावी असल्याचे खूप कमी पुरावे आहेत. कोरोनावरील लस मुबलक प्रमाणात उपलब्ध झाल्यानंतरही मला लसीची गरज पडणार नाही,’ असे त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे बोलसोनारो यांना जुलैमध्येच कोरोना झाला होता.