27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeआंतरराष्ट्रीयतालीबानला कर्जपुरवठा करणार नाही

तालीबानला कर्जपुरवठा करणार नाही

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन : अमेरिकेचे सैन्य माघारी फिरल्यानंतर तालिबानने एकेक प्रांत करून अफगाणिस्तावर पूर्ण ताबा मिळवला आहे. यानंतर आता सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला असून, अन्य देशांकडून मान्यता मिळण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. तालिबानने पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. मात्र, तालिबानची आर्थिक कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू झाले असून, तालिबान कंगालच राहणार असा अंदाज वर्तवला जात आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेने तालिबान सरकारला कोणतेही कर्ज देण्यास नकार दिला आहे. तालिबान्यांना नव्याने कर्ज किंवा इतर मदत केली जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका नाणेनिधी संघटनेने घेतली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे जगभरात १९० सदस्य देश आहेत. संघटनेकडून विकसनशील आणि गरीब देशांना कर्जाच्या स्वरूपात आर्थिक मदत केली जाते. अफगाणिस्तानातील सत्तांतरानंतर प्रथमच नाणेनिधीने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

तालिबानच्या मान्यतेबाबत जागतिक स्तरावर मतभिन्नता
अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारच्या मान्यतेबाबत जागतिक स्तरावर मतभिन्नता आहे. ज्यामुळे अफगाणिस्तानला एमडीआर आणि इतर संसाधने नाणेनिधीकडून उपलब्ध होणार नाहीत, असे मत नाणेनिधीने मांडले आहे. दुसरीकडे, तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर कब्जा मिळवला असला तरी प्रत्यक्षात अफगाणिस्तानच्या तिजोरीत खडखडाट आहे. परकीय गंगाजळीच शिल्लक नसल्याने तालिबानींची नजीकच्या काळात आर्थिक कोंडी होण्याची शक्यता आहे.

अफगाणकडे ९ अब्ज डॉलरची राखीव गंगाजळी
अफगाणिस्तानच्या केंद्रीय बँकेचे गव्हर्नर अजमल अहमदी यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, अफगाणिस्तान सरकारकडे ९ अब्ज डॉलरची राखीव गंगाजळी विदेशात आहे. ज्यात फेडरल रिझर्व्हचे बॉण्ड, सोने आहे. देशात एकही डॉलरची विदेशी मुद्रा रोख स्वरूपात उपलब्ध नाही. तत्पूर्वी, तालिबानला एकतर्फी मान्यता देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका ब्रिटनने जाहीर केली असून, कॅनडानेही तालिबानला लगेच मान्यता देण्यास नकार दिला आहे. अफगाणिस्तानमधील राजकीय नेतृत्व आणि लष्करी अधिका-यांनी शरणागती पत्करल्याने तालिबानने पुन्हा सत्ता स्थापन केली आहे. तालिबान सरकार स्थापनेसाठी हालचाल करत असताना दुसरीकडे अफगाण जनता रस्त्यावर उतरली आहे.

दैनिक एकमतच्या तिसाव्या वर्धापन दिनानिमित्त पेन्सिल च्या टोकावर काढून दिल्या अनोख्या शुभेच्छा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या