नागपूर : प्रतिनिधी
राज्यात विधीसंघर्षग्रस्त बालकांकडून घडणा-या गुन्ह्यांचे स्वरूप दिवसेंदिवस गंभीर आणि चिंताजनक होत आहे. २०२३ या वर्षात अल्पवयीन मुलांवर भारतीय दंड संहितेअंतर्गत ३,५४८ तर विशेष व स्थानिक कायद्यांनुसार ४२२ गुन्हे दाखल झाले. एकूण बालगुन्हेगारांपैकी तब्बल ७९.८३ टक्के मुले ही १६ ते १८ वयोगटातील आहेत. शरीरावरील हल्ल्यांच्या हिंसक गुन्ह्यांसोबतच माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायद्यांतर्गत बालकांवर दाखल गुन्ह्यांची सरासरी ७ पटींनी वाढल्याची धक्कादायक नोंद प्रकाशात आली.
राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) प्रसिद्ध केलेल्या ‘क्राईम इन महाराष्ट्र-२०२३’ या अहवालातील दुस-या टप्प्यातून हे वास्तव समोर आणले आहे. सीआयडीने गेल्या १० वर्षांतील आकडेवारीचा तुलनात्मक अभ्यास करून हे निष्कर्ष नोंदवले आहेत. २०२२ मधील ४,००९ गुन्ह्यांच्या तुलनेत २०२३ मध्ये एकूण बालगुन्हेगारीच्या दरात ११.५ टक्क्यांची (४६१ ने) घसरण झाली असली, तरी विशेष व स्थानिक कायद्यांखालील गुन्ह्यांमध्ये ६.३ टक्क्यांची वाढ झाली आहे. यात जुगार कायद्यांतर्गत गुन्ह्यांमध्ये १६६.६७ टक्के वाढ झाली आहे. वयोमानाच्या दराचा विचार करता, १२ ते १६ वयोगटातील बालकांमधील गुन्हेगारीचे प्रमाण १९.५८ टक्के, ७ ते १२ वयोगटातील ०.५९ टक्के आणि १२ वर्षांखालील मुलांचे प्रमाण ०.५९ टक्के आहे.
सुसंस्कृत पुणे बनले
बालगुन्हेगारीचे केंद्र
विधीसंघर्षग्रस्त बालकांच्या गुन्हेगारीत पुण्याची स्थिती सर्वाधिक चिंताजनक बनली आहे. राज्यात अल्पवयीन मुलांकडून घडलेल्या शस्त्रांशी संबंधित एकूण २९ गुन्ह्यांपैकी सर्वाधिक ११ गुन्हे एकट्या पुणे शहरात घडले. तसेच खुनाच्या गुन्ह्यांत पुण्यामधून सर्वाधिक २३ बालकांना ताब्यात घेण्यात आले. गंभीर गुन्ह्यांच्या प्रकरणात पुण्यात सर्वाधिक २५७ बालकांवर गुन्हे दाखल आहेत. त्यापाठोपाठ नागपूर (२५१), मुंबई (२२४), पिंपरी-चिंचवड (२१४) आणि जालन्याचा (१९७) क्रमांक लागतो.
मुले ऑनलाईन जुगाराच्या जाळ्यात
राज्यात विधिसंघर्षग्रस्त बालकांच्या हातून घडलेल्या खुनाच्या घटनांमध्ये ५.८४ टक्के घसरण झाली. खुनाचा प्रयत्न करण्याच्या घटनांमध्ये ६.०७ टक्के, दुखापतीच्या गुन्ह्यांत २०.८८ टक्के, दंगलीत १२.३७ टक्के आणि महिलांच्या विनयभंगाच्या गुन्ह्यांत १०.८६ टक्के घट झाली असे सीआयडीच्या नोंदी म्हणतात. राज्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यातील गुन्ह्यांमध्ये ७७५ आणि जुगार कायद्याखाली १६६.६७ टक्के वाढ झाली.
इंटरनेटमुळे गुन्हेगारीत वाढ
इंटरनेटमुळे व्यक्त होण्याची माध्यमे सहज उपलब्ध आहेत. यातून हिंसक मजकूर वैध-अवैध, कायदेशीर-बेकायदेशीर आहे. यातला फरक मुलांना कळत नाही. हे धोके न कळाल्याने मुले गुन्हेगारी जाळ्यात अडकतात.
-बाबासाहेब कंगाले, निवृत्त पोलिस आयुक्त
















