Homeअंतरराष्ट्रीयपाकच्या शांतता प्रस्तावाला इराणने धुडकावले

पाकच्या शांतता प्रस्तावाला इराणने धुडकावले

राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही इराणने दिली माहिती

तेहरान : इराण, इस्रायल आणि अमेरिकेतील युद्ध थांबवण्यासाठी पाकिस्तान मध्यस्थी करत आहे. मात्र, आता पाकिस्तानने तयार केलेला १५ सूत्रीय शांतता प्रस्ताव इराणने नाकारल्याचे समोर आले आहे. युद्धविरामाबाबत कोणतीही चर्चा इराणच्या राष्ट्रीय हितांच्या आधारेच होईल, अशी स्पष्ट भूमिका इराणने घेतली आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी याबाबत माहिती दिली.

मीडिया रिपोर्टनुसार, पाकिस्तानने अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांना एक मसुदा प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावात ४५ दिवसांचा युद्धविराम, होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली करणे आणि युद्ध संपवण्यासाठी चर्चेचा मार्ग अशा मुद्यांचा समावेश होता. मात्र इराणने हा प्रस्ताव स्वीकारण्यास नकार दिला. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बगाई यांनी सांगितले की, इराणने मध्यस्थांमार्फत आपली भूमिका आणि अटी आधीच स्पष्ट केल्या आहेत.

दबावाखाली चर्चा होणार नाही
इराणने स्पष्टपणे सांगितले की कोणत्याही दबावाखाली किंवा धमक्यांखाली ते चर्चा करणार नाहीत. इस्माईल बगाई म्हणाले, डेडलाइन देणे आणि युद्धाची धमकी देणे, हे चर्चेशी सुसंगत नाही. इराणच्या काही अटी आहेत, ज्या आमच्या राष्ट्रीय हितांवर आधारित आहेत. इराण आपल्या मागण्या स्पष्टपणे मांडत आहे, याचा अर्थ तडजोड नव्हे तर आत्मविश्वास आहे. अमेरिकेसाठी आमचे राजनैतिक उत्तर तयार आहे, योग्य वेळी त्याची घोषणा केली जाईल.

ट्रम्प यांची इराणला धमकी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला अप्रत्यक्षपणे धमकी दिली आहे. ५ एप्रिल रोजी ट्रम्प यांनी म्हटले की, मंगळवार ७ एप्रिल हा इराणमध्ये पावर प्लांट डे आणि ब्रिज डे असेल. याचा अर्थ इराणच्या वीज प्रकल्प आणि पुलांवर हल्ला होऊ शकतो, असा इशारा असल्याचे मानले जात आहे. ट्रम्प यांनी असेही सांगितले की, अमेरिका आणि इराण यांच्यात सध्या चर्चा सुरू असून ६ एप्रिल रोजी करार होण्याची शक्यता आहे. या सर्व घडामोडीवर सा-या जगाचे लक्ष लागले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR