नवी दिल्ली : पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी दहशतवादी संघटनांच्या रडावर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पश्चिम बंगालमधील वर्धमान भागातून जैश-ए-मोहम्मदच्या एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. या दहशतवाद्याच्या चौकशीतून सदर माहिती मिळाली आहे. विशेष कृती दल याचा सखोल तपास करत असल्याचे म्हटले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विशेष कृती दलाने (एसटीएफ) पश्चिम बंगालमधील वर्धमान येथून बंदी घातलेली दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा सदस्य हमीद मंडल याला अटक केली आहे. या संशयित जैश दहशतवाद्याने मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्यावर हल्ला करण्याची योजना आखली होती, असा संशय आहे. दहशतवाद्याकडून जप्त केलेल्या मोबाइल आणि कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर ही माहिती उघडकीस आली आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमधील बीरभूममध्येही पोलिसांना मोठे यश मिळाले होते.
बीरभूम जिल्ह्यातील नलहाटी भागातील एका बेवारस घरातून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात स्फोटक सामग्री जप्त केली. पोलिसांना एक गुप्त माहिती मिळाली होती. यावर कारवाई करत पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकून मोठ्या प्रमाणात अवैध स्फोटके जप्त केली. जप्त केलेल्या स्फोटकांमध्ये ८०० किलोहून अधिक अमोनियम नायट्रेट, १,२०० हून अधिक जिलेटीनच्या कांड्या, १०५ डेटोनेटर्स आणि ३६ डेटोनेटिंग फ्यूज कॉइल्स जप्त करण्यात आल्या आहेत.
सज्जाद भटचा जवळचा साथीदार
अटक करण्यात आलेला जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी हमीद मंडल हा जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार सज्जाद भटचा जवळचा साथीदार आहे. या दहशतवाद्याला वर्धमान रेनेसान्स टाऊनशिप परिसरातील एका फ्लॅटमधून अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेला दहशतवादी हमीद मंडल गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून याच परिसरातील एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होता. एसटीएफ सध्या या प्रकरणाचा तपास करत असून आरोपीचे नेटवर्क, संपर्क आणि कथित कारवायांची तपासणी करत आहे. या प्रकरणाशी संबंधित इतर संभाव्य संशयित आणि षडयंत्र सिद्धांतांचाही तपास सुरू आहे.
















