अबु धाबी/जेरुसलेम: मध्यपूर्वेतील बदलत्या भूराजकीय समीकरणांमध्ये एक अत्यंत महत्त्वाची आणि ऐतिहासिक घटना घडली आहे. इराणसोबतच्या वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, इस्रायलने आपली अत्यंत प्रगत ‘आयर्न डोम’ (Iron Dome) ही क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) तैनात केली आहे. अब्राहम करारांनंतर दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्याने गाठलेली ही सर्वोच्च पातळी मानली जात आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि UAE चे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्यात झालेल्या थेट चर्चेनंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. इस्रायलने आपल्या देशाबाहेर आणि अमेरिकेव्यतिरिक्त इतर कोणत्याही देशात आयर्न डोम तैनात करण्याची ही इतिहासातील पहिलीच वेळ आहे.ताज्या अहवालांनुसार, UAE वर इराणकडून करण्यात आलेल्या हल्ल्यांदरम्यान या प्रणालीने डझनावारी इराणी क्षेपणास्त्रे आणि ड्रोन यशस्वीरित्या हवेतच नष्ट केले आहेत. केवळ यंत्रणाच नाही, तर ही प्रणाली चालवण्यासाठी आणि स्थानिक संरक्षणात मदत करण्यासाठी इस्रायली संरक्षण दलाचे (IDF) डझनावारी जवानही सध्या UAE मध्ये उपस्थित आहेत.
संरक्षण सहकार्याचे नवे पर्व
२०२० मध्ये झालेल्या अब्राहम करारांनंतर दोन्ही देशांमधील संबंध वेगाने सुधारले आहेत. याआधी UAE ने इस्रायलकडून ‘स्पायडर’ (SPYDER) आणि ‘बराक’ (Barak) सारख्या हवाई संरक्षण प्रणाली घेतल्या होत्या. मात्र, थेट युद्धजन्य परिस्थितीत ‘आयर्न डोम’ची तैनात होणे हे दोन्ही देशांमधील लष्करी आणि गुप्तचर यंत्रणांमधील वाढत्या विश्वासाचे प्रतीक आहे. तज्ज्ञांच्या मते, या भागीदारीमुळे इराणच्या वाढत्या प्रभावाला आळा बसणार आहे. UAE ने आता आपले हवाई संरक्षण अधिक मजबूत केले असून, त्यात इस्रायली तंत्रज्ञानाचा मोठा वाटा आहे. ही भागीदारी केवळ संरक्षण खरेदीपुरती मर्यादित नसून, ती आता थेट लष्करी सहकार्य आणि संयुक्त कमांडपर्यंत पोहोचली आहे.

