जैसलमेर : हमासने ओलिस ठेवलेले तीन इस्रायली नागरिक १५ डिसेंबर रोजी इस्रायलच्याच सैनिकांकडून चुकीने मारले गेले होते. या घटनेचा तपास अहवाल गुरुवारी इस्त्रायलच्या सैन्यदलाने प्रकाशित केला.
अहवालातील माहितीनुसार हत्येच्या काही दिवस आधी इस्त्रायली सैनिक गाझातील इमारतीवर हल्ला करत असताना ओलिसांच्या जवळ आले होते. ते मदतीसाठी आरडाओरड करीत होते; पण हमासच्या दहशतवाद्यांनी फसविण्यासाठी हा बनाव रचल्याचे समजुतीतून इस्त्रायली सैनिकांनी ओलिसांच्या ओरडण्याकडे दुर्लक्ष केले. संबंधित इमारतीत स्फोटके ठेवल्याच्या शक्यतेतून सैनिक तेथून बाहेर पडले.
इस्त्रायली सैन्यदलाच्या तपासानुसार, ओलिसांनी इमारतीतून पलायन केले असावे व त्यांच्यापासून धोका असल्याच्या गैरसमजुतीतून १५ डिसेंबरला इस्रायली सैनिकांनी त्यांना चुकून गोळ्या घालून ठार केले. यामध्ये दोन ओलिसांचा जागीच मृत्यू झाला. तिसरा ओलिस पळून जाण्यात यशस्वी ठरला.
त्याची ओळख पटविण्यासाठी गोळीबार न करण्याचा आदेश सैनिकांना देण्यात आला होता. ‘मदत करा’, ‘ते माझ्यावर गोळीबार करीत आहेत’, असे तो सांगत होता. ते ऐकून इस्रायली कमांडरने सैनिकांना त्याच्या दिशेने जाण्याचा आदेश दिला होता. पण रणगाड्याच्या आवाजामुळे दोन सैनिकांना आदेश ऐकू आला नाही आणि त्यांनी ओलिसावर गोळ्या झाडल्या, असे अहवालात म्हटले आहे.