नबातीह : वृत्तसंस्था
मध्य पूर्वेतील युद्ध आता एका अत्यंत विनाशकारी आणि धोकादायक वळणावर येऊन पोहोचले आहे. इस्रायल आणि लेबनॉनमधील सीमाभागातील तणावाने सर्व मर्यादा ओलांडल्या असून, दक्षिण लेबनॉनमधील ऐतिहासिक आणि गर्दीचा जिल्हा असलेल्या नबातीहवर ) इस्रायली हवाई दलाने आणि तोफखान्याने रात्रभर मृत्यूचा थैमान घातला. मध्यरात्रीनंतर झालेल्या या भीषण आणि अत्यंत क्रूर बॉम्बहल्ल्यांमध्ये आतापर्यंत किमान १६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, मृतांचा हा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
स्थानिक प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला या संपूर्ण युद्धातील नबातीह परिसरावरील आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि प्राणघातक हल्ला ठरला आहे. जेव्हा संपूर्ण शहर गाढ झोपेत होते, तेव्हाच इस्रायली लढाऊ विमानांनी निवासी वस्त्यांवर एकामागून एक शक्तिशाली क्षेपणास्त्रे डागली.
केवळ नबातीह मुख्य शहरच नव्हे, तर त्याच्या आजूबाजूला असलेल्या काफर जौझ, काफर रामोन आणि झेबेदिन् यांसारख्या शांत आणि लोकवस्ती असलेल्या छोट्या शहरांनाही या तोफगोळ्यांच्या मा-याने हादरवून सोडले. या महाभयंकर स्फोटांच्या आवाजाने आणि आगीच्या ज्वाळांनी नागरिक प्रचंड घबराटीखाली वावरत आहेत.
















