24.2 C
Latur
Monday, March 9, 2026
Homeराष्ट्रीयइस्रोने शोधली चांद्रयान-४ साठी लँडिंग साइट

इस्रोने शोधली चांद्रयान-४ साठी लँडिंग साइट

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर मॉन्स माउटन पर्वतावर उतरेल

बंगळूरु : इस्रोने चांद्रयान-४ मोहिमेसाठी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ एक लँडिंग साइट शोधली आहे. चांद्रयान-२ ऑर्बिटरकडून मिळालेल्या छायाचित्रांच्या आधारे, वैज्ञानिकांनी मॉन्स माउटन (एमएम-४) क्षेत्राला लँडिंगसाठी सर्वात योग्य असल्याचे सांगितले आहे.

मॉन्स माउटन हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ स्थित सुमारे ६,००० मीटर उंचीचे पर्वत आहे. याचे शिखर ब-याच अंशी सपाट आहे, जे लँडिंगसाठी अनुकूल आहे. तथापि, लँडिंग साइटबाबत अंतिम निर्णय प्रक्षेपणाच्या जवळ घेतला जाईल. वैज्ञानिकांनुसार, हा परिसर महत्त्वाचा आहे कारण येथे दीर्घकाळ सूर्यप्रकाश मिळतो. याव्यतिरिक्त, या क्षेत्रात वॉटर आइस (पाण्याची बर्फ) असण्याची शक्यताही वर्तवली जाते.

चांद्रयान-२ च्या छायाचित्रांमुळे मिळाली मदत
मीडिया रिपोर्ट्सनुसार, वैज्ञानिकांनी हा अभ्यास लूनर अँड प्लॅनेटरी सायन्स कॉन्फरन्समध्ये सादर केला. लँडिंग साइट निश्चित करण्यासाठी चांद्रयान-२ ऑर्बिटरवर लावलेल्या ऑर्बिटर हाय रिझोल्यूशन कॅमे-याच्या छायाचित्रांचा वापर करण्यात आला. हा कॅमेरा चंद्राच्या पृष्ठभागाला सुमारे ३२ सेंटीमीटर प्रति पिक्सेलच्या रिझोल्यूशनमध्ये दाखवतो. यामुळे लहान खड्डे, दगड, उतार आणि पृष्ठभागाची रचना स्पष्टपणे दिसतात, ज्यामुळे लँडिंगसाठी धोकादायक क्षेत्रांची ओळख आधीच होते.

एमएम-४ ला लँडिंगसाठी का निवडले?
– अभ्यासात मॉन्स माउटन क्षेत्रातील चार वेगवेगळ्या लँडिंग साइट्सचे मूल्यांकन करण्यात आले. यापैकी एमएम-४ साइट सर्वात सुरक्षित मानली गेली.
– या साइटवर सरासरी उतार सुमारे ५ अंश आहे, तर लँडर १० अंशांपर्यंतच्या उतारावर उतरण्यास सक्षम आहे. येथे मोठे दगड कमी आहेत आणि बहुतेक बोल्डर ०.३ मीटरपेक्षा लहान आढळले आहेत, त्यामुळे लँडिंगचा धोका कमी होतो.
– एमएम-४ साइटवर सलग ११ ते १२ दिवस सूर्यप्रकाश मिळण्याची शक्यता आहे.
– या भागातून पृथ्वीसोबत रेडिओ कम्युनिकेशन देखील स्पष्ट राहते, त्यामुळे मिशनदरम्यान संपर्कात कोणतीही मोठी अडचण येत नाही.

नमुने घेऊन परत येईल चंद्रयान-४
२१०४ कोटी रुपयांच्या या मोहिमेत चंद्रावरील खडक आणि माती पृथ्वीवर परत आणली जाईल. या मोहिमेत दोन वेगवेगळ्या रॉकेटचा वापर केला जाईल. हेवी-लिफ्टर एलव्हीएम-३ आणि इस्रोचे विश्वसनीय वर्कहॉर्स पीएसएलव्ही वेगवेगळे पेलोड घेऊन जातील. स्टॅक १ मध्ये चंद्रावरील नमुने गोळा करण्यासाठी एसेंडर मॉड्यूल आणि पृष्ठभागावरून नमुने गोळा करण्यासाठी डिसेंडर मॉड्यूलचा समावेश आहे. स्टॅक २ मध्ये थ्रस्टसाठी प्रोपल्शन मॉड्यूल, नमुने ठेवण्यासाठी ट्रान्सफर मॉड्यूल आणि नमुने पृथ्वीवर परत आणण्यासाठी री-एंट्री मॉड्यूलचा समावेश आहे. चंद्रयान-४ ही इस्रोची आतापर्यंतची सर्वात कठीण चंद्र मोहीम मानली जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR