वॉशिंग्टन : १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धाबाबत ५ दशकांनंतर एक अत्यंत खळबळजनक माहिती समोर आली आहे. त्यावेळचे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी भारताला रोखण्यासाठी आणि पाकिस्तानला वाचवण्यासाठी चीनशी गुप्तपणे संपर्क साधला होता. इतकेच नाही तर, जर चीनने भारतावर हल्ला केला, तर अमेरिका त्यांना पूर्ण पाठिंबा देईल, असे आश्वासन निक्सन यांनी दिले होते. नुकत्याच उघड झालेल्या वॉटरगेट ग्रँड ज्युरीच्या गोपनीय कागदपत्रांमधून हा खुलासा झाला आहे.
गेल्या ५० वर्षांपासून सीलबंद असलेल्या या फाईल्समध्ये निक्सन यांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. निक्सन यांनी मान्य केले होते की, तत्कालीन सोव्हिएत युनियन (रशिया) उघडपणे भारताची पाठराखण करत होते, तर पाकिस्तानकडे शस्त्रास्त्रांचा तुटवडा होता. अशा स्थितीत पाकिस्तानला नैतिक पाठबळ देण्यासाठी निक्सन यांनी स्वत: पुढाकार घेऊन बीजिंगला(चीन) संदेश पाठवला होता. तुम्ही भारतावर लष्करी कारवाई करा, आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू असा शब्द निक्सन यांनी चीनला दिला होता.
स्वत:चाच घेतलेला निर्णय
निक्सन यांनी आपल्या साक्षीत स्पष्ट केले की, चीनला उकसवण्याचा निर्णय त्यांचा वैयक्तिक होता आणि यासाठी त्यांच्या कोणत्याही मंत्र्याने त्यांना सल्ला दिला नव्हता. हा दस्तावेज इतका संवेदनशील होता की तो सरकारी वकिलांपासूनही दूर ठेवून सीलबंद करण्यात आला होता.
युद्ध आणि इतिहास
१९७१ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारताने पाकिस्तानविरुद्ध युद्ध पुकारले आणि केवळ १३ दिवसांत पाकिस्तानचे दोन तुकडे करून बांगलादेश या नवीन राष्ट्राची निर्मिती केली. त्या वेळी अमेरिका पाकिस्तानच्या बाजूने होती, तर रशिया भारताच्या पाठीशी खंबीरपणे उभा होता. जर अमेरिकेच्या सांगण्यावरून चीनने त्यावेळी भारतावर हल्ला केला असता, तर जगाचा नकाशा आणि इतिहास काही वेगळाच असता.

