वॉशिंग्टन डीसी : ओमानच्या समुद्रात भारतीय नाविक असलेल्या जहाजांवर अमेरिकन नौदलाने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढला आहे. या भीषण हल्ल्यांमध्ये ३ भारतीयांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या भारताने २४ तासांत दुस-यांदा अमेरिकेच्या वरिष्ठ राजदूतांना परराष्ट्र मंत्रालयात बोलवून करून तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. मात्र, या गंभीर परिस्थितीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट इराणवर खापर फोडत एक नवा दावा केला आहे.
भारतीय जहाजांवर अमेरिकेने हल्ला केल्याचे सिद्ध झालेले असतानाही, डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा हल्ला अमेरिकेने केला नसल्याचे म्हटले. काल रात्री स्ट्रेट ऑफ होर्मुझमधून बाहेर पडणा-या भारतीय जहाजांवर इराणने केलेला ड्रोन हल्ला पूर्णपणे अस्वीकारार्ह आहे. हा हल्ला आम्ही हाणून पाडला. इराणने आपली वागणूक लवकरात लवकर सुधारावी, नाहीतर याचे गंभीर परिणाम होतील असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. या पोस्टमध्ये ट्रम्प यांनी अमेरिकन हल्ल्यात जीव गमावलेल्या ३ भारतीयांच्या मृत्यूबाबत एक शब्दही काढला नाही. तसेच, ज्या जहाजावर हल्ला झाला ते जहाज होर्मुझ सामुद्रधुनीपासून तब्बल २८ किमी दूर ओमानच्या किनारपट्टीवर होते, अशी माहिती फॉर्वर्ड सीमेन्स युनियन ऑफ इंडियाने दिली आहे. त्यामुळे ट्रम्प यांचा भौगोलिक दावाही फोल ठरला आहे.
अमेरिकन नौदलाचे भीषण हल्ले
अमेरिकेच्या सेंटकॉम आणि नौदलाने गेल्या ४ दिवसांत ओमानच्या किनारपट्टीजवळ भारतीय क्रू मेंबर्स असलेल्या तीन तेल टँकर्सना लक्ष्या केले. एमटी सेटेबेलो या जहाजावर २४ भारतीय खलाशी होते. अमेरिकेच्या एफ-१८ सुपर हॉर्नेट लढाऊ विमानाने या जहाजाच्या इंजिन रूमवर क्षेपणास्त्र डागले. या हल्ल्यात ३ भारतीय खलाशांचा मृत्यू झाला. तर एमटी मॅरीवॅक्स हे जहाज अमेरिकेच्या निर्बंधांच्या यादीत होते. यावरील २४ भारतीय कर्मचा-यांना ओमानच्या नौदलाने सुखरूप वाचवले. एमटी जलवीर या जहाजावर २० भारतीय खलाशी होते. अमेरिकेने यावरही हेलफायर क्षेपणास्त्राने हल्ला केला. ओमानच्या मदतीने यातील सर्व खलाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. अमेरिकेने या हल्ल्यांचे समर्थन करताना म्हटले आहे की, या जहाजांनी इराणवरील अमेरिकन नाकेबंदीचे उल्लंघन केले होते आणि ते इराणमधून तेल वाहतूक करत होते. वारंवार इशारा देऊनही जहाजे न थांबवल्यामुळे त्यांच्या इंजिन रूमवर प्रिसिजन स्ट्राईक करण्यात आले.
अमेरिकन राजदूतांना सलग दुस-यांदा समन्स
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी स्पष्ट केले की हे हल्ले अमेरिकन नौदलाकडूनच झाले आहेत. भारताने याचे अत्यंत गंभीर पडसाद उमटवले असून परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी अमेरिकेचे प्रभारी राजदूत जेसन मीक्स यांना बोलावून कडक शब्दांत सुनावले. व्यावसायिक आणि नागरी जहाजांवर अशा प्रकारे प्राणघातक लष्करी बळाचा वापर करणे अजिबात खपवून घेतले जाणार नाही. आंतरराष्ट्रीय सागरी क्षेत्रातील सुरक्षा आणि भारतीय खलाशांचे प्राण ही भारताची सर्वोच्च प्राथमिकता आहे. अमेरिकेने हे हल्ले त्वरित थांबवावे असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले.
भारतासाठी चिंतेची बाब
सध्या या युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती देशांत आणि होर्मुझ सामुद्रधुनीच्या परिसरात काम करणा-या जवळपास १८,००० हून अधिक भारतीय खलाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भारताच्या जहाजबांधणी मंत्रालयाने सर्व भारतीय खलाशांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.
















