मुंबई : मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीबाबत सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. राज्यातील अनेक ठिकाणचे कार्यकर्ते एकमेकांना भेटत आहेत. कार्यकर्त्यांचे मनोमिलन सुरू झाले असून नेत्यांचे मनोमिलन कधी होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. याच दरम्यान उद्धव ठाकरे यांनी मोठे विधान केले आहे. जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल, लवकरच बातमी देईन असे म्हटले आहे.
शिंदे गटाच्या सुजाता शिंगाडे यांनी आज ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. याच दरम्यान उद्धव ठाकरे यांनी संवाद साधत ‘मनसे’सोबतच्या युतीवर भाष्य केले आहे. जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल. त्याबद्दलचे बाकीचे जे काही बारकावे आहेत ते आमचे आम्ही बघत आहोत. शिवसैनिकांच्या मनात कुठेच संभ्रम नाही. त्यांचे जे सैनिक संपर्कात आहेत, त्यांच्याही मनात संभ्रम नाही. संदेश देण्यापेक्षा लवकरच जी काही बातमी द्यायची आहे ती देऊ असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील याबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. नेत्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याने कार्यकर्त्यांचे मनोमिलन सुरू आहे. राज ठाकरे यांचे सहकारी आणि उद्धव ठाकरे यांचे सहकारी या विषयावर अत्यंत सकारात्मक आहेत. त्याचाच परिणाम जमिनीवर कार्यकर्त्यांचे मनोमिलन झाले असेल. त्यात चिंता करण्यासारखे काय आहे, उलट या गोष्टीचे स्वागत करायला हवे असे राऊत यांनी म्हटले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरेंनी मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेना युतीवरही भाष्य केलं आहे. दोन भावांनी बोलले पाहिजे. त्यांच्याकडे एकमेकांचे नंबर आहेत, ते बोलू शकतात अशी प्रतिक्रिया दिली होती. माझी भूमिका एवढीच आहे की, दोन भावांनी बोलले पाहिजे. आम्ही बोलून काही फरक पडणार नाही. दोन भाऊ एकत्र येण्यात मला काही इश्यू नाही. मी २०१४, २०१७ ला बघितले आहे, कोरोना काळातही पाहिले, कोरोनात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा राज साहेबांनी उद्धवजींना पहिला फोन केला होता.
हा भीषण आजार आहे. त्यामुळे कोणतंही सरकार असो, आपण साथ दिली पाहिजे असे म्हटले होते. त्यांची इच्छा असेल तर त्यांनी फोन करावा. हे मीडियासमोर बोलून किंवा वर्तमानपत्रात बोलून युती होत नाही. त्यांच्याकडे एकमेकांचे नंबर आहेत, ते बोलू शकतात असे अमित ठाकरे यांनी म्हटले आहे.