पुणे : प्रतिनिधी
साखरेचे दर तेजीत असताना आता गुळाच्या दरात गेल्या १५ दिवसांत किलोमागे सात ते आठ रुपयांनी वाढ झाली आहे. सणासुदीच्या काळात गुळाची दरवाढ झाली आहे. यापुढील काळात गुळाला मागणी वाढणार असून, दिवाळीपर्यंत गुळाचे दर तेजीत राहणार असल्याची माहिती व्यापा-यांनी दिली.
‘श्रावण महिना गुरुवारपासून (१३ ऑगस्ट) सुरू होणार आहे. श्रावण महिन्यात गुळाच्या मागणीत वाढ होणार आहे. नागपंचमी, राखीपौर्णिमा असे महत्त्वाचे सण आहेत. गणेशोत्सव, नवरात्रोत्सवानंतर दिवाळीत गुळाला उच्चांकी मागणी असते. ऊस लागवडीत घट झाल्यानंतर साखरेच्या दरात वाढ झाली.
साखरेच्या दरात गेल्या महिन्याभरात किलोमागे सहा ते सात रुपयांनी वाढ झाली. उसाचा तुटवडा जाणवत असल्याने गूळ उत्पादनात घट झाली आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाने (एफडीए) कारवाई केल्यानंतर गु-हाळे बंद झाली. कारवाई झाल्यानंतर गुळाची आवक कमी झाली होती. जून महिन्यात मार्केट यार्डातील घाऊक भुसार बाजारात दररोज २० टन गुळाची आवक होत होती. गुळाची आवक आता पुन्हा वाढली आहे.
‘पुणे जिल्ह्यातील दौंड, यवत, केडगाव, तसेच सांगली जिल्ह्यातून गुळाची आवक होत आहे. पुण्यातील बाजारपेठेसह नाशिक, ठाणे, भिवंडी, कल्याण येथील बाजारपेठेतून गुळाला मागणी वाढली आहे. गुजरात, छत्तीसगड, ओडिशा, मध्य प्रदेश या राज्यांतून गुळाला मागणी वाढली आहे,’ असे त्यांनी नमूद केले. गेल्या काही वर्षांत गुळाचा चहा पिण्याचे प्रमाण वाढले आहे. चहा विक्रेत्याकंडून गुळाला मागणी वाढली आहे.
‘एफडीए’च्या कारवाईनंतर बिगर भेसळीचा गूळ
अन्न आणि औषध प्रशासन विभागाने (एफडीए) गु-हाळांवर कारवाई केली होती. त्यानंतर रंग आणि साखरेची भेसळ न करता गु-हाळात पारंपरिक पद्धतीने गूळ तयार केला जात आहे. बाजारात सध्या शुद्ध गुळाची आवक होत आहे.















