मुंबई : प्रतिनिधी
मुंबईतील विलेपार्ले भागात असलेले जुने पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर मुंबई महानगरपालिकेने दोन दिवसांपूर्वी पाडले होते. मुंबई पालिकेच्या या कारवाईनंतर देशभरातील जैन समुदाय संतप्त झाला आहे. मुंबई मनपाच्या कारवाईविरोधात जैन समाजाकडून शनिवारी अहिंसक रॅली काढण्यात आली. या रॅलीत मोठ्या संख्येने जैन समाजबांधव सहभागी झाले होते. त्यांच्या हातात ‘मंदिर टूटा, हौसला नही’, असे फलक होते. मंदिर पुन्हा बांधून देण्याची मागणी या लोकांनी केली. रॅलीत स्थानिक सर्वपक्षीय नेतेसुद्धा सहभागी झाले होते.
दरम्यान, शनिवारी सकाळी ९.३० वाजता जैन समाजाकडून आंदोलन सुरू झाले. आंदोलनापूर्वी जैन बांधवांनी तोडलेल्या मंदिरामध्ये आरती केली. त्यानंतर आंदोलनास सुरुवात झाली. ‘मंदिर टूटा, हौसला नही,’ असे फलक घेऊन जैन समाजबांधव रस्त्यावर उतरले. मंदिर त्याच ठिकाणी हवे, अशी मागणी आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली. आंदोलनात भाजप नेते आणि मंत्री मंगलप्रभात लोढा, काँग्रेस नेत्या आणि खासदार वर्षा गायकवाड, आमदार पराग अलवाणी यांच्यासह इतर स्थानिक नेते सहभागी झाले होते.
मंदिर पुन्हा बांधून देण्याची मागणी
जैन समाजाच्या या आंदोलनात जैन समाजातील महिलासुद्धा मोठ्या संख्येने उतरल्या आहेत. आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांनी बीएमसीची कारवाई योग्य नसल्याचे म्हटले आहे. मनपाने केलेल्या कारवाईमुळे माफी मागावी आणि मंदिर पुन्हा बांधून द्यावे, अशी मागणी समाजबांधव करत आहेत.
अहिंसक आंदोलन करायचे : लोढा
मंदिरावर झालेल्या कारवाईविरोधात गुरुवारी रात्री जैन समाजाने एका सभेचे आयोजन केले होते. यावेळी मंगलप्रभात लोढाही उपस्थित होते. मंदिर तोडण्याच्या कारवाईमागे आर. के. हॉटेलचा हात असल्याचा आरोप स्थानिकांनी आणि इतर वक्त्यांनी केला होता. तसेच यासंबंधात कारवाई करण्याची मागणी त्यांनी लोढा यांच्याकडे केली होती. संपूर्ण मुंबईतील अहिंसक समाजाने एकत्र यायचे आहे. अहिंसक आंदोलन करायचे आहे. सर्वांनी आपला निषेध नोंदवायचा आहे, असे लोढा म्हणाले होते.