जालना : ऑनलाइन गेमचा जबर झटका जालना जिल्ह्यातल्या ढगी गावच्या तरुणाला बसला. या खेळापायी तो तब्बल ४० लाखांचा जुगार हरला. त्यासाठी त्याला घरातली शेतीही विकावी लागली. परमेश्वर केंद्रे असे त्या तरुणाचे नाव आहे.
परमेश्वरने सायबर पोलिसांकडे धाव घेतली. मात्र, त्यांनी अजून तरी गुन्हा दाखल करून घेतला नाही. मात्र, त्याला बँक स्टेटमेंट आणण्याचा सल्ला दिला आहे.ढगी गावच्या परमेश्वर केंद्रेला मॉस्ट बेट हा ऑनलाइन गेम खेळण्याचा नाद लागला. त्याने याची सुरुवात शंभर रुपयांपासून केली. तो यात अनेकदा जिंकला. त्याला त्याचे पैसे मिळाले. तेव्हा तो दोनशे, पाचशे असे रुपये लावून खेळू लागला. हा आकडा नंतर हजारोंमध्ये गेला. इथूनच त्याच्या पडझडीची सुरुवात झाली.
परमेश्वरला काही दिवस दैव साथ द्यायचे. तर अनेकदा तो पैसे हरायचा. मात्र, पुन्हा-पुन्हा तर हे हरणे वाढत गेले. या ऑनलाइन गेमचे हे व्यसन त्याला इतके भारी पडले की, त्याने यापोटी चक्क चाळीस लाख रुपये गमावले. त्यासाठी रस्त्याच्या शेजारी असलेली शेतीही त्याने विकली. आता तो चक्क एका टपरीवर कुटुंबाचा उदनिर्वाह भागवतो आहे.
काय आहे मॉस्ट बेट?
एका परदेशी कंपनीने मॉस्ट बेट गेमची निर्मिती केली. मात्र, हा गेम भारतात खेळण्यासाठी बंदी आहे. तो प्ले स्टोअरवरही उपलब्ध नाही. अनेकजण तो लिंकद्वारे डाऊनलोड करतात आणि पैसे लावायला सुरुवात करतात. या सुरुवातीला बोनस मिळतो. या आमिषापोटी खेळणे सुरू होते. याचे रूपांतर नंतर अक्षरश: व्यसनात होते.
तरुणांमध्ये फॅड
जालना जिल्ह्यातल्या अनेक तरुणांमध्ये ऑनलाइन गेमचे फॅड आहे. बरेच जण आयपीएलच्या सामन्यावर पैसे लावतात. तर अनेकजण ऑनलाइन पत्ते खेळतात. सुरुवातीला या मुलांना पैसे येतातही. त्यामुळे या गेमची सवय आणि चटक लागते. मात्र, नंतर पैसे गेल्याने मोठे नुकसान सहन करावे लागते. अनेकजण ऑनलाइन लॉटरीवरही पैसे लावतात.
नाशिक जिल्ह्यातही घटना
नाशिक जिल्ह्यातही ऑनलाइन गेममध्ये अनेक तरुणांची फसवणूक झाल्याचे मागे समोर आले होते. तिथे अशा टोळ्या सक्रिय आहेत की, ते ऑनलाइन गेम खेळण्यास प्रोत्साहन देतात. प्रसंगी कर्जासाठी पैसा पुरवतात. नंतर मात्र त्या मोबदल्यात शेतजमीन नावावर करून घेतात. यातून अनेक तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत.