पीएम किसान अनुदान वाटपापूर्वीच डल्ला
जालना : जालना जिल्हा बँकेच्या पानेवाडी शाखेतून सव्वासात लाखांच्या रोकडसह चोरट्यांनी तिजोरी लंपास केली आहे. शेतक-यांच्या पीएम किसान अनुदान वाटपापूर्वीच चोरट्यांनी डल्ला मारला. या चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमे-याचा डिव्हीआरही पळविला आहे.
जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील पानेवाडी गावातील जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेचे चॅनल गेट आणि दरवाजाचे कुलूप तोडून चोरी झाल्याचा प्रकार काल सकाळी उघडकीस आला होता. चोरट्यांनी थेट बँकेची लोखंडी तिजोरी आणि सीसीटीव्ही कॅमे-याचा डीव्हीआर गायब केला.
या तिजोरीत रोख ७ लाख २८ हजार १६८ रुपये होते. रोख रक्कम, १२ हजारांची लोखंडी तिजोरी आणि १० हजारांचा डिव्हीआर असा एकूण ७ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. पीएम किसान सन्मान योजनेचे अनुदान शेतक-यांना वाटप करण्यासाठी आले होते. मात्र, तत्पूर्वीच चोरट्यांनी डल्ला मारला. त्यामुळे खळबळ उडाली आहे. बँकेचे शाखा व्यवस्थापक रघुनाथ जाधव यांच्या फिर्यादीवरून घनसावंगी पोलिसांनी काल रात्री उशिरा गुन्हा दाखल केला.
गणेशमूर्तींचे विसर्जन न करता त्याची छुप्या पद्धतीने विक्री-शिवसेनेने आरोप