22.9 C
Latur
Saturday, September 25, 2021
Homeजालनाबाप-लेक पुरात गेले वाहून; पुलावर प्रवाह वाढल्याने घडला अपघात

बाप-लेक पुरात गेले वाहून; पुलावर प्रवाह वाढल्याने घडला अपघात

एकमत ऑनलाईन

 जालना : जिल्ह्यातील भोकरदन तालुक्याला अतिवृष्टीचा फटका बसला असून, तालुक्यातील सोयगाव परिसरातील नदी-नाले भरले आहेत. सोयगावच्या पुलावरील पाण्याच्या प्रवाहात वाहत गेल्याने वडिलांसह सहा वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

सोयगाव येथील विलास शालिकराम सहाने (३३) आपली सहा वर्षांची मुलगी कल्याणी हिला सोबत घेऊन शनिवार दि. १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलवर गावामध्ये किराणा सामान घेण्यासाठी गेले होते. ते कुटुंबासह गावाच्या बाजूला एक किलोमीटरवर शेत वस्तीमध्ये राहतात. गावामध्ये पोहोचल्यावर जोरदार पावसाला सुरुवात झाली. जोरदार पावसाने अर्ध्या तासात परिसरातील नद्या-नाल्यांचे पाणी वाढले.

सामान खरेदी केल्यानंतर पाऊस थांबण्याची वाट बघण्यापेक्षा घरी जाण्याचा विचार विलास यांनी केला. पावसाचा जोर कायम असताना ते मुलीसह मोटारसायकलवरून शेतातील घराकडे निघाले. सायगाव पुलाजवळ आल्यानंतर पुलावरून पाणी वाहत असल्याचे त्यांना दिसले. पावसाचा जोर वाढत असल्याने पाणी आणखी वाढल्यास आपण अडकून पडू, असे त्यांना वाटले. त्यामुळे मोठ्या हिमतीने त्यांनी पूल पार करण्याचे ठरवले. अर्धा पूल ओलांडल्यानंतर पाण्याचा प्रवाह वाढल्याने त्यांचा तोल गेला आणि गाडीवरून पडून विलास मुलीसह पाण्याच्या प्रवाहासोबत पुलाखालच्या भागात वाहत गेले.

रात्री ९ वाजता गावक-यांच्या मदतीने घरच्यांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. पुलाजवळ काही अंतरावर विलास यांची मोटारसायकल गावक-यांना दिसली. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास मुलीचा मृतदेह पुलापासून दीड किलोमीटरवर आढळला. तर रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सोयगावपासून पाच किलोमीटरवर वालसा गावाजवळ झुडपांमध्ये विलास यांचा मृतदेह आढळला. त्यांचे मृतदेह भोकरदन ग्रामीण रुग्णालयात पाठवून शवविच्छेदन करण्यात आले. दुपारी एक वाजता सोयगावमध्ये त्यांच्या पार्थिवावर अन्त्यसंस्कार करण्यात आले.

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील ग्रामीण व्यक्तींना चाचणी करण्यासाठी रुग्णवाहिका मिळेना

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या