जालना : राणी भुजंग रा. बदनापूर इयत्ता नववी, कल्याणी शिंदे रा.पोखरी ता. जाफ्राबाद इयत्ता आठवी, मोनिका पवार रा. पळसखेडा ता. जालना इयत्ता नववी, नंदा नागवे भोकरदन इयत्ता आठवी, श्रद्धा उबाळे नंदापूर इयत्ता दहावी, वैष्णवी चांदगुडे नंदापूर इयत्ता सातवी, या सर्व मुली जिल्हाच्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत शिकणा-या सर्व मुलींचे आई-वडील शेतकरी आहेत. यातील प्रत्येकीला कबड्डी, खो खो, व धावण्यात करिअर करायचे आहे. मात्र या सहा मुलींसारखीच आणखीन ५० मुले व ५० मुली असे एकुण १०० विद्यार्थी जिल्ह्याच्या कानाकोप-यातून येवून जिल्हा परिषद निवासी क्रिडा प्रबोधिनीच्या माध्यमातून शास्त्रोक्त पद्धतीने क्रीडा शिक्षण घेत आहेत.
जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मीना यांच्या मार्गदर्शनखाली व शिक्षणाधिकारी प्राथमिक कैलास दातखिळ, शिक्षणाधिकारी माध्यमिक श्रीमती मंगल धुपे, उप शिक्षणाधिकारी माध्यमिक विपुल भागवत, प्राथमिक श्रीमती विनया वडजे, यांच्या नियोजनानुसार ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणा-या व क्रीडा विषयक आवड असणा-या मुला मुलींना शोधून त्यांना शास्त्रोक्त पद्धतीने प्रशिक्षित करणे, सोबतच ग्रामीण भागातील या मुलांना वैयक्तिक व कौंटुबिक अडचणीमुळे खेळापासून दुर जावू नयेत यासाठी कोल्हापुर येथील राजश्री शाहू निवासी क्रीडा प्रबोधिनीच्या धर्तीवर १०० मुलांकरिता जिल्हाची ठिकाणी जिल्हा परिषद निवासी क्रीडा प्रबोधिनी मागील चार वर्षापासून काम करतेय.
शहरातील जि.प.प्रशाला मुलांची याठिकाणी १७ जुन २०१९ रोजी उद्घाटन झालेल्या या प्रबोधिनीत आजघडीला ५० मुले व ५० मुली जिल्हातील तज्ञ मार्गदर्शकाच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेत आहेत.मागील पाच वर्षापासून जालना जिल्हा परिषद दरवर्षी जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मुलांच्या क्रिडा गुणांना संधी देण्याचे काम झाले. मात्र या स्पर्धेपुरतेच मुलांचे कौतुक व्हायचे नंतर या मुलांमधील क्रिडागुणांना कुठेच वाव दिला जात नव्हता. हाच धागा पकडून निवासी क्रिडा प्रबोधनी सुरु करण्यात आली होती. व आज ती या मुलांच्या विविध प्रकारच्या खेळातील यशामुळे नावारुपास आली आहे.
आजपर्यंत या निवासी क्रिडा प्रबोधिनीमधील कबड्डीमध्ये राष्ट्रीय स्तरावर एक, राज्यस्तरावर २८, विभागस्तरावर ३६, जिल्हा स्तरावर १५२, तालुकास्तरावर ७२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून यश संपादन केले आहे. खो खो मध्ये राज्यस्तरावर ३१, विभागस्तरावर ४३, जिल्हा स्तरावर १०५, तालुकास्तरावर ९३ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून यश संपादन केले आहे. व्हॉलीबॉलमध्ये राज्यस्तरावर २, विभागस्तरावर २४, जिल्हा स्तरावर ३६, विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून यश संपादन केले आहे. अॅथलेटिक्समध्ये राष्ट्रीय स्तरावर २०, राज्यस्तरावर ७४, विभागस्तरावर ५९, जिल्हा स्तरावर १३८, तालुकास्तरावर १२२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून यश संपादन केले आहे.
खर्च कसा भागवला जातो
महाराष्ट्र राज्यात ९ क्रिडा प्रबोधिनी या राज्याच्या
क्रिडा व युवक संचालनालयामार्फत चालविल्या जातात तर कोल्हापूर येथील पहिली व जालना येथील राज्यातील एकमेव दुसरी जिल्हा परिषद निवासी क्रीडा प्रबोधिनी ही जिल्हा परिषद शिक्षकांच्या निधीतून चालवली जाते. दरवर्षी जिल्हातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या वार्षिक पगारातून एकवेळ एक हजार रुपये या निवासी क्रीडा प्रबोधिनीसाठी शिक्षक स्वयंस्फूर्तीने निधी म्हणून देतात. हा निधी दरवर्षी एक कोटी १६ लाख ६२ हजार २०० जमा होतो. यात दरवर्षी जिल्हा परिषदेतील शेष फंडातील दहा लाख रुपये या निवासी क्रीडा प्रबोधिनीसाठी उपयोगात आणले जातात. सुरुवातीला २०१९ साली एकाचवेळी मानव विकास मिशन अंर्तगत एक कोटी ४० लाख रुपये खर्चून वसतिगृह बांधकाम, मैदान बांधकाम, वसतिगृहातील खोल्यांमधील भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या.
याठिकाणी मैदानी खेळ ४०,कबड्डी ३० मुले ,खो खो ३०मुले अशी एकूण १०० मुले आपले उज्ज्वल भविष्य विविध क्रिडा प्रकारात आजमावत आहेत.
तज्ज्ञ प्रशिक्षकांची नावे
ज्येष्ठ प्रशिक्षक प्रमोद खरात यांच्या मार्गदर्शनाखाली याठिकाणी अॅथलेटिक्ससाठी संतोष मोरे, कबड्डीसाठी रंिवद्र ढगे, खो-खोसाठी छत्रपती पुरस्कार प्राप्त श्रीमती प्रियंका येळे, सचिन दोडके, गृहप्रमुख राजु पुरी, विजय खेडेकर श्रीमती बाललक्ष्मी पेद्दी, मैदान सेवक योगेश भूतेकर, दत्तात्रय ताकटे हे काम करतात. मुलांच्या राहण्यासाठी वेगवेगळी व्यवस्था करण्यात आली असून सोबतच वाचनालयाची पुस्तके उपलब्ध करुन देवून खेळासोबतच अध्ययन प्रवन या मुलांना ठेवले जाईल.
सकाळी साडेपाच वाजता या मुलांची दिनचर्या सुरु होते.सकाळच्यावेळी मैदानी खेळासोबतच खेळातील कौशल्य विकसनावर भर दिला जाणार आहे.नंतर सायंकाळी या मुलांना त्यांनी निवडलेल्या क्रिडा प्रकाराविषयी शास्त्रोक्त मार्गदर्शन प्रबोधिनीतील क्रिडा शिक्षक करतात. जिल्हास्तरावर क्रिडा नैपुण्य चाचणी दिली होती यातून या १०० मुलांची निवड करण्यात आली होती.
आर्थिक पाठबळ देण्याची गरज
जिल्हा परिषद निवासी क्रीडा प्रबोधिनी ही केवळ जिल्हा परिषद शिक्षकांच्या वार्षिक वेतनातून एक वेळा एक हजार रुपये प्रतिशिक्षक व जिल्हा परिषदेच्या शेष फंडातून दहा लाख रुपये एवढ्यावरच चालते. मात्र आजमितीस याठिकाणी खरी गरज आहे ती या प्रबोधिनीला डीपीडीसी मधून भरीव रक्कम तरतूदीची. तसेच शहरातील उद्योगपती, शहरातील एम आय डी सी परिसरासह इतर उद्योग क्षेत्रातील उद्योगपतींनी सीएसआर मधून व सामाजिक संस्थानी मदत करुन या ग्रामीण भागातून आलेल्या व क्रीडा क्षेत्रात आपले भविष्य उज्ज्वल करण्यासाठी धडपडणा-या चिमुकल्यांसाठी मदत करावी.
भविष्यात देशाचे नाव उज्ज्वल होणार : मीना
निरोगी शरीरातच निरोगी मन वास करते या उक्तीप्रमाणे खेडायापाड्यातील जिल्हा परिषद शाळेत शिकणा-या मुलांमध्ये क्रिडा नैपुण्य मोठ्या प्रमाणात भरलेले असते, त्यांना हक्काचे व्यासपिठ व शास्त्रोक्त पद्धतीने खेळ शिकविण्यासाठी या क्रिडा प्रबोधनीच्या मोठ्या प्रमाणावर उपयोग होईल.व यातून भविष्यात देशाचे नाव या क्रिडा प्रकारात ही मुले उज्ज्वल करतील असे मत मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. जालनाच्या श्रीमती वर्षा मीना यांनी व्यक्त केले आहे.