27.7 C
Latur
Friday, July 18, 2025
Homeमहाराष्ट्रजरांगेंनी बोलावली रविवारी महाबैठक

जरांगेंनी बोलावली रविवारी महाबैठक

जालना : राज्यातील गोर-गरीब मराठा समाजातील लेकरांच्या हितासाठी, भविष्यासाठी ही शेवटची अंतरवाली सराटीतील बैठक होणार आहे. उद्या अंतिम निर्णायक बैठक होईल. उद्या दिशा ठरवली जाणार आहे. २९ ऑगस्ट रोजी मुंबईत जायचे आहे, मराठा समाजाच्या मागण्या, आतापर्यंत काय मिळाले आणि आता आपल्याला काय मिळवायचे आहे, याबाबत चर्चा होणार आहे. त्यामुळे उद्या दुपारी १२ वाजता या, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. सोमवारपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी बोलावलेली महाबैठक महत्त्वाची मानली जात आहे.

अंतरवाली सराटीत उद्या मराठा समाजाची महाबैठक पार पडणार आहे. या बैठकीसाठी मराठा समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले आहे. घराघरातील मराठा समाज इथे प्रत्यक्ष येणार आहे. फेसबुक, सोशल मिडिया, व्हॉट्स ऍप यावर घरी बसून बघण्यापेक्षा आपण सगळ्यांनी उद्या १२ वाजता अंतरवालीत या. कारण आपल्याला प्रत्यक्ष चर्चा करायची आहे. आपली एकजूट दिसली पाहिजे. घरी बसून आपली एकजूट दिसत नाही. आपल्या लेकरा-बाळांच्या आयुष्याचा प्रश्न जर मार्गी लावायचा असेल, तर आपली सगळी कामे बाजूला ठेवून एकत्र यायला पाहिजे. महाराष्ट्रातील कानाकोप-यातील मराठ्यांनी यावे. इथे आल्यानंतर प्रत्यक्ष तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या जातील. सगळ्या गोष्टी सोशल मिडिया आणि मीडियाच्या माध्यमातून सांगता येत नाही. खूप महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले.

बैठकीचा मुख्य अजेंडा काय?
कोणत्या विषयावर ठराव करून, त्यावर ठाम निर्णय घ्यायचे आहेत, यावर बैठकीत चर्चा होणार आहे. समाज शेवटी एकजूट राहायला पाहिजे. समाजाला आपल्याला उंचीवर न्यायचे आहे. समाज खाली राहता कामा नये. त्यासाठी प्रत्यक्ष बैठकीला उपस्थित राहून आपण आपली एकजूट दाखवायची आणि आपल्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करून घ्यायची.

समाज मोठा करणे, लेकरं-बाळं मोठी करणे, हाच मुख्य या बैठकीचा अजेंडा आहे. आपली लेकरे खुर्चीवर बसली पाहिजेत, ते अधिकारी झाले पाहिजे, मराठा समाजावर होत असलेला अन्याय थांबला पाहिजे, मराठा समाजाच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी नीट झाली पाहिजे, असे मनोज जरांगे यांनी सांगितले.

आता विजय मिळवायचा आहे. सगळेच आता सांगून योग्य होणार नाही. माझा आणि माझ्या समाजाचा काय उद्देश आहे, बैठकीचे मुख्य धोरण काय आहे. आपल्याला काय करायचे आहे आणि काय मिळवायचे आहे, हे उद्या सविस्तर मराठा समाजाला सांगणार आहे. राज्याच्या कानाकोप-यातून येणा-या समाजाच्या समोर सगळ्या गोष्टींचा उलगडा करणार आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. मनोज जरांगे पाटील आता नेमकी काय भूमिका घेतात, याकडे आता राज्यातील जनतेचे आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR