नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायाधीश सूर्यकांत यांची भारताचे ५३ वे सरन्यायाधीश (सीजेआय) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते २४ नोव्हेंबर रोजी शपथ घेतील, अशी घोषणा कायदा मंत्रालयाने गुरुवारी केली. ते विद्यमान सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांची जागा घेणार आहेत.
सरन्यायाधीश गवई यांचा कार्यकाळ २३ नोव्हेंबर रोजी संपत आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या ६५ व्या वर्षी निवृत्त होतात. न्यायमूर्ती सूर्यकांत यांचा कार्यकाळ अंदाजे १४ महिन्यांचा असेल. ते ९ फेब्रुवारी २०२७ रोजी निवृत्त होतील. सरन्यायाधीश गवई यांनी सोमवारी केंद्र सरकारकडे त्यांच्या नावाची शिफारस केली होती.
न्यायव्यवस्थेच्या २० वर्षांच्या कारकिर्दीत, न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी अनेक महत्त्वाचे निकाल दिले. पेगासस हेरगिरी प्रकरणात, ते चौकशीसाठी सायबर तज्ज्ञांची समिती स्थापन करणा-या खंडपीठाचा भाग होते.
हरियाणातून पहिले सरन्यायाधीश
भारतीय न्यायव्यवस्थेत सर्वोच्च पदावर पोहोचणारे न्यायमूर्ती सूर्यकांत हे हरियाणातील पहिले व्यक्ती असतील. त्यांच्या नावाची शिफारस करताना, सरन्यायाधीश गवई यांनी सांगितले की न्यायमूर्ती सूर्यकांत हे सर्वोच्च न्यायालयाचे नेतृत्व करण्यासाठी योग्य आणि सक्षम आहेत.
















