29.9 C
Latur
Tuesday, February 10, 2026
Homeराष्ट्रीयईडीच्या ‘समन्स’ निगडीत दोन खटल्यातून केजरीवाल यांची निर्दोष सुटका

ईडीच्या ‘समन्स’ निगडीत दोन खटल्यातून केजरीवाल यांची निर्दोष सुटका

अरविंद केजरीवाल यांना मोठा दिलासा

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बजावलेल्या समन्सकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करणे आणि चौकशीला हजेरी न लावल्याच्या आरोपातून न्यायालयाने केजरीवालांची निर्दोष सुटका केली आहे. दिल्ली मद्य घोटाळ्याशी निगडीत चौकशीसाठी ईडीने केजरीवाल यांना सहा वेळा समन्स बजावले होते.

केवळ चौकशीला उपस्थिती लावली नाही म्हणजे जाणीवपूर्वक अनादर केला असे म्हणता येत नाही असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना आरोपातून निर्दोष मुक्त केले. अरविंद केजरीवाल यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करत ‘सत्यमेव जयते’, अशी पोस्ट ‘एक्स’वर केली आहे. न्यायालयाकडून आम आदमी पक्षाचे आमदार आणि दिल्ली वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष अमानतुल्ला खान यांनाही दिलासा मिळाला आहे. दिल्ली वक्फ बोर्डातील कथित बेकायदेशीर भरतीशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अमानतुल्ला खान ईडीसमोर हजर राहण्यास अपयशी ठरल्याचा आरोप त्यांच्यावर होता.

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केजरीवाल यांच्याविरोधात फेब्रुवारी आणि मार्च २०२४ मध्ये दोन गुन्हे नोंद केले होते. भारतीय दंड संहिता कलम १७४ (सरकारी अधिका-याच्या आदेशाकडे दुर्लक्ष करुन चौकशीला हजर न राहणे) या अंतर्गत केजरीवाल यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता.

ई-मेलद्वारे बजावलेले समन्स सिद्ध करण्यात अपयश
ई-मेलद्वारे बजावलेले समन्स ईडीला सिद्ध करता न आल्याने न्यायालयाने केजरीवालांना दोन्ही प्रकरणातून निर्दोष मुक्त केले. ‘गुन्हेगारी प्रकरणांत पुरावा म्हणून समन्स प्रत्यक्ष देण्याची गरज असते’, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने अमानतुल्ला खान यांना देखील समन्सकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपातून मुक्त केले. वक्फ बोर्डातील कथित घोटाळ्यासंबधित सीबीआय आणि भ्रष्टाचार विरोधी पथकाने खान यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. याचा आधार ईडीने घेतला होता. अमानतुल्ला खान यांनी तपास यंत्रणेने जारी केलेल्या अनेक समन्सकडेही दुर्लक्ष केले, असा आरोप ईडीने केला. पण, राऊस अव्हेन्यू न्यायालयाने ईडीचे आरोप फेटाळून लावत खान यांना निर्दोष मुक्त केले.

मद्य घोटाळा प्रकरणात झाली होती अटक
चौकशीला हजर का राहता आले नाही याचे स्पष्टीकरण देताना, विधानसभा, राज्यसभा निवडणूक आणि मुख्यमंत्री म्हणून पार पाडव्या लागणा-या जबाबदा-या अशी कारणे केजरीवाल यांनी दिली. दरम्यान, मनी लाँड्रिंग प्रकरणात २१ मार्च २०२४ रोजी त्यांना ईडीने अटक केली होती. वादग्रस्त मद्य घोटाळाप्रकरणात त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली होती. दरम्यान, २५ जून २०२४ रोजी त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाकडून देखील १२ जुलै २०२४ रोजी त्यांना अंतरिम जामीन मंजूर झाला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR