मुक्ताईनगर : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा आमदार एकनाथ खडसे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने आज मुक्ताईनगरमध्ये सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला खासदार तथा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. मात्र, आजच्या कार्यक्रमाला भाजपचे एकही वरिष्ठ नेते उपस्थित नव्हते. त्यामुळे, अनेकांचा भुवया उंचावल्या. मात्र, भाजपला उभी करण्यात एकनाथ खडसेंचे मोठे योगदान असल्याचे शरद पवारांनी आपल्या भाषणात म्हटले. एकनाथ खडसेंनी भाजपमध्ये काम केले, भाजप उभा कुणी केली असेल तर नाथाभाऊ आणि प्रमोद महाजन यांचं नाव घ्याव लागेल, असे म्हणत महाराष्ट्र भाजपच्या उभारणीत एकनाथ खडसेंचे योगदान शरद पवारांनी सांगितले.
अनेक वर्षे या भागाची सेवा करण्याचे काम एकनाथ खडसे यांनी केले. या मतदारसंघाने त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेत अनेकवेळा निवडून दिले. १९६७ ला मी देखील महाराष्ट्राच्या राजकारणात निवडून गेलो. विधानसभेच्या सभागृहात २ माणसांची भाषणे कायम लक्षात राहिली, एक पाटील आणि दुसरे नाथाभाऊ. सभागृहात अतिशय प्रभावीपणे त्यांनी आपले मुद्दे मांडले, असे म्हणत शरद पवारांनी एकनाथ खडसेंच्या राजकीय कारकिर्दीचे कौतुक केले. मंत्रिमंडळात गेल्यानंतर १२ खाती सांभाळणारा एकमेव मंत्री नाथाभाऊ होते. भाजपमधे त्यांनी काम केले, भाजप उभा कुणी केली असेल तर नाथाभाऊ आणि प्रमोद महाजन यांचे नाव घ्याव लागेल, असे म्हणत महाराष्ट्र भाजपच्या उभारणीत एकनाथ खडसेंचं योगदान शरद पवारांनी सांगितले.
जयंत पाटलांकडून कौतुक
नाथाभाऊ विधीमंडळात त्यांच्या प्रवेशापासून आम्ही त्यांची राजकीय कारकिर्द जवळून पाहिली आहे, त्या काळात त्यांचा पक्ष वाढविण्यासाठी त्यांनी अविरत मेहनत घेतली. नाथाभाऊंना विधानसभेत कोणालाही थांबवता येत नसायचे, त्यांचा आवाज असा होता, की समोरच्याला बोलता येत नसे, विधानसभेत आल्यावर सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम कसे करायचे हे त्यांच्यापासून शिकायला मिळाले, अशा शब्दात जयंत पाटील यांनी एकनाथ खडसेंचे कौतुक केले.
नाथाभाऊंसारखा नेता सहज
शक्य नाही : जयंत पाटील
सत्ता आल्यावर शेतक-यांच्या हितासाठी त्यांनी आपली शक्ती पणाला लावून काम केले. अशक्य वाटणा-या पाण्याच्या योजना त्यांनी राबवून दाखवल्या, त्यांच्या काळात विकासाची कामे केली, त्याचे बीज त्यांनी रोवले, त्यांच्या कार्यकाळात राज्यभर माणसे जोडली. नाथाभाऊंसारखा नेता सहज शक्य नाही, त्यांच्या मेहनतीने ते पुढे आले आहेत. नाथाभाऊंनी घेतलेल्या कष्टामुळेच त्यांना आज अनेक व्याधींमधून जावे लागत आहे. शरद पवार यांचा आदर्श घेऊन त्यांनी कार्यरत रहावे, निरोगी आयुष्यासाठी त्यांना शुभेच्या, प्रतिकूल परिस्थितीमध्येही फिनिक्स पक्षाप्रमाणे उभा राहण्याची त्यांची ताकद आहे. पन्नास वर्षांचा दाम्पत्याचा प्रवास शंभर वर्षांपर्यंत राहील, अशा शुभेच्छाही जयंत पाटील यांनी दिल्या.
















