नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंजाब दौ-यापूर्वी फिरोजपूर कॅन्ट रेल्वे स्थानकाचा एक व्हीडीओ समोर आला आहे. हा व्हीडीओ प्रतिबंधित फुटीरतावादी संघटना सिख फॉर जस्टिसने जारी केला आहे. व्हीडीओमध्ये दिल्लीला जाणा-या एका ट्रेनच्या डब्यांवर खालिस्तान जिंदाबाद आणि मोदी मुर्दाबाद यांसारख्या वादग्रस्त घोषणा लिहिलेल्या दिसत आहेत.
एसएफजेचा दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूने व्हीडीओ जारी करून पंजाबमधील दहशतवादाच्या काळातील मानवाधिकार कार्यकर्ते जसवंत सिंग खालडा यांच्या वारशाचा उल्लेख करत कथित एन्काउंटर प्रकरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जसवंत सिंग खालडा यांच्यावरच दिलजीत दोसांझचा सतलज हा चित्रपट बनला होता, जो प्रदर्शित झाल्यानंतर दुस-याच दिवशी ओटीटीवरून काढून टाकण्यात आला होता आणि आता तो पूर्णपणे बॅन करण्यात आला आहे. दरम्यान, व्हीडीओ समोर आल्यानंतर गुप्तचर यंत्रणा स्थानक परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमे-यांचे फुटेज तपासत आहेत.
पोलिस त्या लोकांचा शोध घेत आहे, ज्यांनी रात्रीच्या अंधारात ट्रेनच्या डब्यांवर हे नारे लिहिले. संपूर्ण परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पंतप्रधानांचा लुधियाना आणि जालंधरचा प्रस्तावित दौरा १५ आणि १७ जुलै या दोन तारखांना आहे. पंतप्रधान या दोन दिवसांत कोणत्याही दिवशी येऊ शकतात. जालंधर कॅन्ट रेल्वे स्टेशनच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करतील. त्याच दिवशी ते चंदीगडमध्येही ४ प्रकल्पांचे उद्घाटन करू शकतात.
















