श्रीनगर : अमेरिका-इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला आहे. खामेनेई यांच्या मृत्यूनंतर जगभरात विरोध प्रदर्शन सुरू झाले आहे. भारतातही त्यांच्या मृत्यूचे पडसाद उमटले आहेत. भारतातील अनेक भागात शिया समुदायातील मुस्लिमांनी खामेनेई यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला. रविवारी श्रीनगरपासून उत्तर प्रदेशातील लखनौपर्यंत शिया मुस्लीम समुदायातील लोक रस्त्यावर उतरले होते. या घटनेचा निषेध करत लोकांनी अमेरिका-इस्रायलविरोधात घोषणाबाजी केली.
खामेनी यांच्या मृत्यूनंतर भारतात रस्त्यावर उतरणा-या लोकांमुळे सरकारने खबरदारीचे पाऊल उचलले आहे. जम्मू काश्मीरच्या श्रीनगर भागात सरकारकडून निर्बंध लावण्यात आलेत. ज्या भागात लोकांनी उतरून खामेनेई यांच्या मृत्यूबद्दल आक्रोश केला त्या लाल चौकातील परिसर प्रशासनाकडून सील करण्यात आला आहे. क्लॉक टॉवरच्या आसपासही सुरक्षा व्यवस्था कठोर करण्यात आली आहे. सोबतच शाळा आणि कॉलेज पुढील २ दिवस बंद ठेवण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. काश्मीरमधील विद्यापीठांच्या परीक्षाही स्थगित करण्यात आल्या आहेत.
ठिकठिकाणी होतोय विरोध
इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांच्या मृत्यूची बातमी मिळताच भारतातील अनेक भागात विरोध प्रदर्शन पाहायला मिळाले. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथेही शिया समुदायातील लोकांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. मौलाना कल्बे जवाब साहब यांनी लोकांना आवाहन करत रविवारी दुकाने बंद ठेवून ३ दिवस शोक पाळण्याचं आवाहन केले आहे. दक्षिण काश्मीरच्या पुलवामा आणि कुलगाम येथेही लोक जमा झाले होते. पुलवामाच्या गंगू परिसरातील मुख्य चौकात मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर उतरून खामेनेई यांच्या मृत्यूचा शोक व्यक्त करत होते. देशातील उत्तरेकडे श्रीनगर, बांदीपोरा, अनंतनाग, गांदरबलसह अन्य भागात या घटनेचा विरोध केला जात आहे.
इराण घेणार बदला
इस्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त हल्ल्यात खामेनेई यांचा मृत्यू झाला. खामेनी यांच्या मृत्यूने इराणमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. खामेनी यांच्या हत्येचा बददला घेण्याची शपथ इराणने रविवारी घेतली. अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणने आखाती देश आणि इस्रायलमधील अमेरिकेच्या तळांवर टार्गेट हल्ला केल आहे. तर अमेरिकेकडूनही हल्ल्याला प्रत्युत्तर दिले जात आहे.

