Homeमहाराष्ट्र‘खरात फाईल्स’; सरकार धोक्यात?

‘खरात फाईल्स’; सरकार धोक्यात?

लोकप्रतिनिधी, मंत्र्यांचे लागेबांधे चाकणकरांची हकालपट्टी करा विरोधक सत्ताधारी आक्रमक चाकणकरांनीही तंत्रमंत्र, जादूटोणा केल्याचा आरोप सुषमा अंधारेंनी फोटोही दाखवले

पुणे/मुंबई/नाशिक : खरातच्या मोबाईलमध्ये अनेक आक्षेपार्ह व्हीडीओ क्लिप्स सापडल्या असून त्यामुळे सत्ताधारी गटातील काही नेते तणावात आहेत. या प्रकरणात राज्यातील काही मंत्रीही त्याचे भक्त होते. ते त्याच्याकडे जाऊन विचित्र आणि घृणास्पद विधी करत होते, असा आरोप त्यांनी केला. हे व्हीडीओ सार्वजनिक झाले तर महाराष्ट्रातील सरकार कोसळू शकते, असा धक्कादायक इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.

या कारवाईबाबत राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदनही केले. त्यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून अत्यंत गुप्तपणे या प्रकरणाची चौकशी सुरू होती. गृहखात्याच्या माध्यमातून आखलेल्या कारवाईमुळे या प्रकरणाची पाळेमुळे उखडली जात आहेत. अशा प्रकारच्या घटनांनी महाराष्ट्राची बदनामी होते. त्यामुळे दोषींवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री जर या प्रकरणात स्वच्छता मोहीम राबवत असतील, तर ते कौतुकास पात्र आहे, असेही राऊत म्हणाले.

नाशिक येथील अशोक खरात प्रकरणाची राज्यभरात चर्चा सुरू असून आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले. रूपाली चाकणकर यांना तात्काळ पदावरून हटवून त्यांना अटक करावी आणि त्यांची नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी अंधारे यांनी केली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, रूपाली चाकणकर आणि अशोक खरात यांचे सीडीआर तपासले जावेत. इतकेच नाही तर या दोघांना समोरासमोर बसवून चौकशी होणे गरजेचे आहे.

चाकणकर या राजकीय दबावाचा वापर करू शकतात, यामुळे त्यांचा राजीनामा घ्यावा, अशा मागणीही अंधारे यांनी केली. त्या फरार होण्यापूर्वी पोलिसांनी त्यांना ताब्यात घ्यावे, असेही अंधारे म्हणाल्या. यावेळी सुषमा अंधारे यांनी चाकणकर स्वत: तंत्रमंत्रमध्ये होत्या असा धक्कादायक आरोप केला. याबाबत एका पीडितेने आपल्याला सांगितल्याचा दावा अंधारे यांनी केला. २ सप्टेंबर २०२४ ला रोजी सोमवती अमावस्येला स्वत:ची अनामिका कापली होती. रुपाली चाकणकर तंत्रमंत्र विद्या करत होत्या, असा धक्कादायक आरोप सुषमा अंधारे यांनी केला.

संपत्तीची चौकशी करा
या प्रकरणात केवळ पोलिसच नाही, तर ईडी आणि आर्थिक गुन्हे शाखेने लक्ष घालण्याची गरज असल्याचे अंधारे यांनी म्हटले. खरात याच्या मालमत्ता देश-विदेशात पसरलेल्या आहेत, त्यामुळे खरात आणि चाकणकर यांच्या संपत्तीचे स्त्रोत तपासले जावेत, अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे.

अंधारेंना धमक्यांचे फोन
या खळबळजनक प्रकरणानंतर सुषमा अंधारे यांनी आपल्याला धमक्या येत असल्याचे सांगितले. मला कालपासून ८ वेगवेगळया नंबरवरून धमक्यांचे फोन येत आहेत. अत्यंत घाणेरड्या भाषेत मला धमकावले जात आहे असेही त्या म्हणाल्या.

भोंदू बाबाला चाकणकरांचे अभय : दमानिया
अंजली दमानिया यांनी अशोक खरात आणि रूपाली चाकणकर यांचे एकत्रित फोटो ट्विट केले आहेत. भोंदू बाबाला कोणाचे अभय होते, असा गंभीर सवाल उपस्थित केला आहे. या फोटोंमुळे महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून रुपाली चाकणकरांची तात्काळ पदावरून हकालपट्टी करा, अशी मागणी सुद्धा दमानिया यांनी केली आहे.

मुंडे-खरात एकाच वृृत्तीचे : करुणा मुंडे
धनंजय मुंडे आणि अशोक खरात हे एकाच वृत्तीचे लोकं आहेत. तपास केला तर मुंडे आणि खरातांचा संबंध आहे हे उघड होऊ शकते असे मला वाटते. रुपाली चाकणकर यांना पाठिशी घालण्याचा खूप लोकं प्रयत्न करत आहेतअसे म्हणत करुणा मुंडे यांनी निशाणा साधला आहे.

अमोल कोल्हे यांनी काव्यातून टीका
महिला आयोगातील जिजाऊंच्या फोटोला ताड्कन तडा गेला, जेव्हा तिथल्या खुर्चीला रांझ्याच्या पाटील पितृतुल्य झाला! त्या खुर्चीतून बेगडी नैतिकता ओसंडून वाहिली, सामाजिक, कौटुंबिक कि वैयक्तिक सारी सीमारेषाच पुसट झाली. काठी आधाराची होती खरी, पण स्वार्गापायी मोडून पडली, न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या अहिल्येची पुन्हा एकदा शिळा झाली. सावित्रीची लेक जिथे भोंदू पावलांवर झुकली, गुलामगिरी, सार्वजनिक सत्यधर्म सा-या सा-या अक्षरधनाची अक्षरश: होळी झाली.

खरातचे राजकीय कनेक्शन उघड
नाशिकमधील स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ अशोक खरात याच्या अटकेनंतर त्याचे अनेक राजकीय नेत्यांसोबतचे फोटो आणि व्हीडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. या छायाचित्रांमध्ये नीलेश लंके, जयंत पाटील, मिलिंद नार्वेकर आणि दीपक केसरकर यांसारख्या अनेक नेत्यांसोबतचे फोटो उघड झाले आहेत.

ऑफिसबॉयचा धक्कादायक कट उघड
नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील ‘ओजस प्रॉपर्टीज’ या ठिकाणी हे सर्व प्रकार घडत होते. डिसेंबर २०२५ मध्ये नीरज जाधव याने खरातच्या नकळत या ५८ महिलांशी संबंधित व्हीडिओ आणि इतर पुरावे चोरून नेले. त्यानंतर पैशांच्या लालसेपोटी त्याने या सामग्रीचा वापर करून ब्लॅकमेलिंगची योजना आखली. सुरुवातीला नीरजने या व्हीडीओंच्या आधारे थेट खरातलाच पाच कोटी रुपयांची खंडणी मागितली. मात्र, खरातने त्याकडे दुर्लक्ष करत उलट त्याच्याविरोधात वावी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याचे समोर आले. त्यानंतर नीरजने आपली दिशा बदलत थेट पीडित महिलांनाच लक्ष्य केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR